
मुसळधार पाऊस आणि सोसाटय़ाच्या वाऱ्य़ामुळे पालिकेच्या ‘डी’ प्रभागात पेडर रोडजवळ एन. एस. पाटकर मार्गालगत असणारी संरक्षक भिंत खचल्याने 50 हून अधिक झाडे उन्मळून पडल्याची घटना बुधवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत जलवाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक उपाययोजना वेगाने करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्य़ांना दिले.
दक्षिण मुंबईत पेडर रोडवरून बाबुलनाथ परिसराच्या दिशेने येताना एन. एस. पाटकर मार्ग असून या रस्त्याच्या वरच्या बाजूस नेहरू उद्यानाकडून येणारा बी. जी. खेर मार्ग आहे. बी. जी. खेर मार्गाची संरक्षक भिंत ही पाटकर मार्गाला लागून आहे. दक्षिण मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे ही संरक्षक भिंत हळूहळू खचत आहे. तसेच वेगवान वाऱ्य़ामुळे या ठिकाणची झाडेदेखील उन्मळून पडत आहेत. संरक्षक भिंत खचल्याने पाटकर मार्गावर निर्माण झालेला ढिगारा तसेच उन्मळून पडलेली झाडे हटविण्याचे काम डी विभाग काऱ्य़ालयाच्या यंत्रणेने, अग्निशमन दल आदींच्या समन्वयाने तातडीने सुरू करण्यात आले आहे. अनेक झाडे कोसळल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली होती. दरम्यान, महापौर आढावा घेताना खासदार अरविंद सावंत, अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.
बुधवारी ‘26 जुलै’सारखी स्थिती
दक्षिण मुंबईत बुधवारी 4 तासांत तब्बल 300 मिमी पाऊस झाला. यावेळी प्रतितास 101 किमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळेच ही चक्रीवादळ सदृश्य आणि 26 जुलै 2005 सारखी भयावह स्थिती निर्माण झाली होती अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. नरिमन पॉइंट, कुलाबासह डी विभागात विक्रमी पाऊस झाला. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही पालिका आयुक्त म्हणाले.
जलवाहिन्यांचे नुकसान, परिसरात टँकरने पाणी
या ठिकाणची संरक्षक भिंत खचल्याने या ठिकाणाहून जाणाऱ्य़ा 4 जलवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे एन. एस. पाटकर मार्ग, ए. के. मार्ग, पेडर रोड, सोफिया लेन, कार्माईकेल मार्ग, राघोजी मार्ग, फॉर्जेट हिल व रोड, अल्टामाऊंट रोड आदी भागांमध्ये पाणीपुरवठा किस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन सदर बाधित भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सरू करण्यात आला आहे. सदर जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच पऱ्य़ायी जलवाहिनी जोडून संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे कामदेखील हाती घेण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.
























































