दै. पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक मुरलीधर शिंगोटे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता ऊर्फ बाबा शिंगोटे (82) यांचे आज दुपारी जुन्नर येथील गायमुखवाडी येथील निवासस्थानी निधन झाले. दै. मुंबई चौफेर, दै. पुण्य नगरी, वार्ताहर या मराठी भाषिक वृत्तपत्रांसह अन्य भाषिक दैनिके प्रकाशित करून मुरलीधर शिंगोटे यांनी अनेकांना  रोजगार  दिला. ही  वृत्तपत्रे  यशस्वीपणे चालवली. त्यांच्या निधनाने पुण्य नगरी वृत्तपत्र समूहाचा आधारवड हरपला आहे.

मुरलीधर शिंगोटे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज या गावी 7 मार्च 1938 ला झाला होता. इयत्ता चौथी शिक्षण झाल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी त्यांनी मुंबई गाठली. सुरुवातीला फळविक्री, त्यानंतर बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम त्यांनी सुरू केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुंबईतल्या फाऊंटन परिसरात आंदोलन झाले होते, त्याचे बाबा साक्षीदार होते. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. 1994 मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभूमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरू केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ 1999 मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

‘वृत्तपत्रसृष्टीतील प्रेरणादायी प्रवास थांबला’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समूहाचा सर्वेसर्वा असा प्रेरणादायी प्रवास पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनामुळे थांबला आहे. त्यांची मराठी वृत्तपत्र क्षेत्रातील वाटचाल यापुढेही अनेकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्रसमूहाचा सर्वेसर्वा असा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. त्यांची वाटचाल यापुढेही अनेकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनामुळे वृत्तपत्रसृष्टीतील प्रेरणादायी प्रवास थांबला. ज्येष्ठ संपादक मुरलीधर शिंगोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.