
कोल्हापूर जिह्यातील धरणांच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे शनिवारी पहाटे बंद झाले. त्यामुळे धरणाच्या दोन दरवाजांसह विद्युत विमोचकातून चार हजार 256 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ पाच इंचांची घट झाली असून, नदी अजूनही 43 फुटांच्या धोका पातळीपासून दीड फुटांवर वाहत आहे. दरम्यान, अजूनही 85 बंधारे पाण्याखाली असून, कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गासह 44 मार्ग बंद आहेत.
गेल्या महिनाभरापासून गायब झालेल्या पावसाने गेल्या चार दिवसांत जोरदार हजेरी लावून पूरसदृश स्थिती निर्माण केली आहे. सुदैवाने कोयनेतून अद्याप विसर्ग करण्यात आलेला नाही. शिवाय अलमट्टीतून काल दीड लाख तर आज 2 लाख 20 हजारपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. शिवाय कोल्हापूर जिह्यात पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात राहिल्याने तूर्त महापुराची गंभीर परिस्थिती नियंत्रणात आली असली, तरी पूरग्रस्त भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरूच आहे.
महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये समन्वय कायम ठेवा!
शनिवारी महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे पंचगंगा नदीची पाणीपातळी व नदी काठावरील पूरपरिस्थितीबाबत सद्यःस्थितीची माहिती घेतली. यानंतर दोन्ही मंत्र्यांनी महाराष्ट्र व कर्नाटकमधील उपस्थित अधिकाऱयांसोबत बोरगाव येथे आढावा बैठक घेतली. दोन्ही राज्यांकडून सध्या समन्वय राखला जात आहे, यापुढे तो कायम ठेवावा, असे आदेश दोन्ही मंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱयांना दिले.



























































