रणजी अन् मुश्ताक अली टी-20 स्पर्धेकडेच बीसीसीआयचे लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा फटका हिंदुस्थानातील स्थानिक क्रिकेट मोसमाला बसणार आहे. बीसीसीआयने आगामी मोसमात कोणकोणत्या स्पर्धा खेळवण्यात येतील याबाबत आराखडा तयार केल्याचे वृत्त एका वृत्तपत्रामधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. याप्रसंगी रणजी व मुश्ताक अली टी-20 या दोनच स्पर्धा खेळवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करणार असल्याचे समजते. त्यामुळे मोसमातील इतर स्पर्धा रद्द होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

19 नोव्हेंबरपासून टी-20 स्पर्धा

राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीचे प्रमुख राहुल द्रविड व आयपीएलचे प्रभारी सीईओ हेमांग अमीन यांच्याकडून आगामी स्पर्धांबाबतचे वेळापत्रक ठरवण्यात आले आहे. आयपीएल आटोपल्यानंतर मुश्ताक अली टी-20 स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा 19 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत होईल. तसेच 13 डिसेंबरपासून रणजी ट्रॉफीला सुरुवात होईल. ही स्पर्धा 10 मार्चपर्यंत सुरू राहील.

रणजी चॅम्पियन सौराष्ट्राचा संघ इराणी ट्रॉफीला मुकणार

बीसीसीआयकडून या मोसमात जास्त स्पर्धा खेळवण्यात येणार नाही. त्यामुळे देवधर, दुलीप, विजय हजारे, इराणी या स्पर्धा होण्याची शक्यता कमीच आहेत. गेल्या वर्षी सौराष्ट्र संघाने रणजी स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे त्यांना या मोसमात इराणी ट्रॉफीमध्ये शेष हिंदुस्थानला लढत द्यावी लागली असती, पण सौराष्ट्राला इराणी ट्रॉफीला मुकावे लागणार आहे.