नाशिकमध्ये युको बँकेवर दरोडा; भिंतीला भगदाड पाडून संगणक, लॅपटॉप पळवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवारी कारंजा या शहरातील मध्यवर्ती परिसरातील युको बँकेच्या मागील भिंतीला भगदाड पाडून आत घुसून दरोडेखोरांनी तीन संगणक, लॅपटॉप, सीसीटीव्हीचा डीव्हीआर पळवला. तिजोरी फोडण्याचा प्रयत्न मात्र फसला. सोमवारी सकाळी ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

यशवंत मंडईतील युको बँकेला शनिवारी व रविवारी सुट्टी होती. अधिकारी-कर्मचारी आज सकाळी कामावर आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. बँकेच्या पाठीमागील भिंतीवरील एसी डक्ट फोडून आत घुसून दरोडेखोरांनी सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची तोडफोड केली. वरच्या बाजूचा काचेचा दरवाजाही तोडला. बँकेतून तीन संगणक, एक लॅपटॉप, सीसीटीव्ही डीव्हीआर पळवला, तेथील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न मात्र फसला.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. तसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले. बँकेचे व्यवस्थापक आकाश शहा यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी दिली.

सुरक्षारक्षकच नाही
घटना घडली तेव्हा अलार्म वाजला नाही, तसेच बँकेबाहेर सुरक्षारक्षकही नव्हता. बँक प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी व्यापाऱयांनी केली आहे.