
कोरोना विषाणूचा फैलाव थांबवण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. लग्नासारख्या कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्यासाठी लोकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. लग्नाच्या वेळी उपस्थितांनी आणि आयोजकांनी योग्य ती काळजी घेण्याचे निर्देशही दिले आहेत. या नियमांचे बिनधास्तपणे उल्लंघन करणं 2 जणांच्या मृत्यूस कारण ठरलं आहे. हे दोघेजण पुण्यातील नगर रस्त्यावर असलेल्या हयात रिजन्सीमध्ये आयोजित लग्नसोहळ्याला हजर राहिले होते. इथे एकूण 250 जण आले होते अशी माहिती तक्रारदाराने दिली आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे की आनंद गोयल नावाच्या व्यक्तीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की लग्नाला आलेल्या दोघांचा मृत्यू झालाय शिवाय 25 जण कोरोनाग्रस्त झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे लग्नाचं आयोजन करणाऱ्या कपिल गर्ग आणि हयात हॉटेलचे व्यवस्थापक निशाल तिवारी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
30 जून रोजी हे लग्न झाल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. हे लग्न आपल्याच समाजातील उद्योजक कुटुंबातील असल्याने 50 पेक्षा जास्त लोकं या लग्नाला आली होती याची आपल्याला पक्की माहिती असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. पुणे शहरात एकीकडे कडकडीत लॉकडाऊन पाळला जात असताना दुसरीकडे किमान 250 माणसे एकत्र जमून या लग्न समारंभात सहभागी झाली होती. हॉटेलवाल्यांकडे लग्नाच्या आदल्या दिवशीचं आणि लग्नाच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज मागितलं असता या चार दिवसांत सीसीटीव्ही खराब झाले असल्याचं हॉटेलकडून उत्तर देण्यात आलं असं या इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. हॉटेलचे महाव्यवस्थापक शोभित सॉहनी यांनी आपण पोलिसांना तपासात सर्वतोपरी सहकार्य करू असे म्हटले आहे.


























































