आधीच्या प्रेयसीवर दिवसाला 50 हजार खर्च, फ्लॅटचे हप्तेही सुशांत भरत होता; ED च्या तपासात खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती, भाऊ शौविक यांची चौकशी सुरू आहे. तसेच सुशांतच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी ईडी करत असून तो आधीच्या प्रेयसीवर एका दिवसासाठी 50 हजार रुपये खर्च करत होता असा खुलासा झाला आहे. तसेच आधीची प्रेयसी राहत असलेल्या फ्लॅटचे हप्ते देखील सुशांतच्या खात्यातून भरले जात होते, असेही समोर आले आहे. मात्र ही प्रेयसी कोण याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. याबाबत ‘एबीपी न्यूज’ने वृत्त दिले आहे.

ईडीच्या तपासात आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. सुशांतच्या विविध बँक खात्यात अद्यापही कोट्यवधी रुपये असल्याचे समोर आले आहे. याच दरम्यान त्याने केलेल्या खर्चाची माहिती देखील समोर आली असून एका आठवड्यात त्याने 28 लाख रुपये खर्च केले होते. 13 ते 21 नोव्हेंबर 2019 दरम्यान त्याने हा खर्च केला होता. सुशांतने यादरम्यान एकाच दिवशी 7 लाख रुपये खात्यातून काढले होते. यातील 5 लाख रुपये चेकद्वारे आणि 2 लाख रुपये एटीएममधून काढण्यात आले होते.

तसेच सुशांतच्या खात्यातून एका अशा फ्लॅटचे हप्ते भरले जात होते जिथे त्याची आधीची प्रेयसी राहते. तसेच तो आधीच्या प्रेयसीवर दिवसाला 50 हजार रुपये खर्च करत होता असेही चौकशी दरम्यान समोर आले आहे. ईडीने जमा केलेल्या कागदपत्रा मधून त्याच्या खात्यात अद्यापही कोट्यवधी रुपये असल्याचे दिसते. स्टॅण्ड चार्ट बँकेत 25 ते 30 लाख, एचडीएफसी बँकेत 1 कोटींहून अधिक आणि कोटक बँकेत 2 कोटी 24 लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे.