
पालिका आयुक्त राहत असलेला बंगला हा 100 वर्षे जुना असून तो पुरातन वास्तूंमध्ये येतो. या बंगल्यातील अनेक ठिकाणी पाणी गळती, भिंतींना ओलावा, तडे गेले आहेत, खिडक्या, दरवाजे यांना वाळवी लागली आहे. त्यामुळे बंगल्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर, या बंगल्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
मुंबई पालिकेच्या ‘डी’ विभाग हद्दीमध्ये एम. एल. डहाणूकर मार्गावर मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालिंसह चहल यांचे सेवा निवासस्थान आहे. 1920 मध्ये बांधण्यात आलेला हा बंगला पुरातन वास्तूंच्या यादीत दर्जा ‘2-ब’ मध्ये येतो. या एकमजली वास्तूचे ऑडिट जून 2019 मध्ये करण्यात आले. मेसर्स शशांक मेहंदळे अॅण्ड असोसिएटस् यांनी या परीक्षण अहवालामध्ये सर्वंकष दुरुस्ती व संवर्धनात्मक कामे करण्याच्या शिफारशी केल्या. त्या आधारे या बंगल्याच्या दुरुस्तीकरीता मुंबई संस्कृती वारसा जतन समितीने ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्रदान केले आणि आता त्याच आधारे दुरुस्तीचे काम सुरू आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

























































