
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा संततधार पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने,तसेच राधानगरीसह वारणा, दूधगंगा आदी धरणातून विसर्ग सुरू असल्याने, नद्यांच्या पातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.
चोवीस तासांत सकाळी पंचगंगेच्या पाणीपातळीत तब्बल पाच ते सहा फुटांची वाढ झाली होती तर 65 बंधारे पाण्याखाली गेले होते. पावसाचा जोर पाहता पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान दुपारी बाराच्या सुमारास पंचगंगेची राजाराम बंधारा पाणी पातळी 33 फूट 5 इंच इतकी झाली होती.(पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट आहे)
राधानगरी धरणाचे तीन दरवाजे पुन्हा उघडले
दोन दिवसांपूर्वी राधानगरी धरणाचे दरवाजे बंद झाले होते. पण धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सुरु झाल्याने, राधानगरी धरण पुन्हा शंभर टक्के भरले. त्यामुळे काल सकाळीच अकराच्या सुमारास धरणाचे 3 आणि 6 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले.तर सायंकाळी सहाच्या सुमारास 5 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला.धरणातुन 5 हजार 684 क्युसेक विसर्ग सुरू होता.
याशिवाय आज सकाळच्या अहवालानुसार, राधानगरीसह कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, कोदे (लपा) ही धरणे व मध्यम आणि लघुपाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरली आहेत. तर तुळशी (92), वारणा (88), दुधगंगा (92), कासारी (84), कुंभी (86), पाटगाव (98) तर चिकोत्रा धरण (77) टक्के भरले आहे. तसेच तुळशी-328, वारणा- 12 हजार 984, दुधगंगा- 4 हजार 800, कासारी- 1 हजार 750, कडवी-1 हजार 608, कुंभी -350, चित्री -1 हजार 568, जंगमहट्टी-335, घटप्रभा -6 हजार 331, जांबरे -1 हजार 694 आणि कोदेमधून 703 क्युसेक विसर्ग सुरू होता. दरम्यान कोयना धरणातून सकाळी साडे आठपासून 25 हजार 604 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.सकाळी अकरानंतर वाढ होऊन, एकूण 35 हजार, दुपारी दोन नंतर 40 हजार क्युसेक असे विसर्गाचे टप्पे वाढविण्याचे नियोजन करण्यात आल्याने, कोयना व कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
अलमट्टीचा विसर्ग वाढवला
कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा साठा सकाळी 115.871 टीएमसी होता. धरणात 1 लाख 27 हजार 200 क्युसेक पाणी जमा होत होते.तर 82 हजार क्युसेक विसर्ग सुरू होता.कोयनेसह कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांचा विसर्ग आणि नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ पाहता, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी तातडीने चर्चा केली.यानंतर अलमट्टी मधून 2 लाख क्युसेकचा विसर्ग करण्यात आला.

























































