
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या पर्लकोटा नदीला महापूर आला. पूराचे पाणी मुख्य बाजारपेठेत शिरले. सर्वत्र धावपळ सुरू झाली. व्यापारी मिळेल त्या साधनांनी आपापल्या सामानाची आवराआवर करुन सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊ लागले.
दिवसभर पुराचे पाणी वाढतच होते. सायंकाळ झाली. अंधार पडू लागला. दोन दिवसांपासून वीज नसल्याने अंधारात पूर परिस्थितीवर नियंत्रण कसे ठेवायचे, हा प्रश्न प्रशासनाला भेडसावू लागला. नायब तहसीलदार प्रकाश पुप्पलवार यांना टॉवर एल.ई.डी लाईटची आठवण झाली. लगेच भामरागडच्या मुख्य चौकात हा लाइट लावण्यात आला. याचा प्रकाशझोत एवढा स्पष्ट होता की चौकापासून थेट पर्लकोटा नदीपर्यंत सर्व स्पष्ट दिसत होते. त्यामुळे वीजेअभावी या टॉवर एल.ई.डी.लाईटमुळे रात्रीच्या वेळी पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवता आले.
हा टॉवर एल.ई.डी.लाईट गेल्या दोन वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या स्टोअर रुममध्ये धूळखात पडून होता. मात्र योग्य वेळेस सुचलेल्या कल्पनेने पुप्पुलवार यांनी कृती करत चौकापासून पर्लकोटा नदीपर्यंतचा भाग प्रकाशमान केला. आधुनिक साहित्याच्या वापराने भामरागड येथील जीवित व वित्तहानी टाळता आली.


























































