लेख – प्रतिभावंत आणि वेगळेपण जपणारा नाटककार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयू भाटकर

मयेकर यांनी कधीच एका साच्यातील नाटके लिहिली नाहीत. त्यांच्या प्रत्येक नाटकात एक वेगळेपण आहे. ‘तक्षकयाग’सारखं नाटक तर दुसरीकडे ‘पांडगो…’सारखं नाटक लिहिणारे ते प्रतिभावंत नाटककार होते. त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण नाटकांनी आज आपली मराठी रंगभूमी समृद्ध झाली आहे. ते सशक्त नाटककार होते. त्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमी गाजवली. मात्र ते त्या झगमगाटाच्या वलयात रमले नाहीत. 18 ऑगस्ट हा प्र. ल. मयेकर यांचा स्मृतिदिन. त्यांच्या पाचव्या स्मृतिदिनी त्यांच्या कारकीर्दीला एक उजाळा.

हिंदुस्थानात रंगभूमीला खूप मोठा इतिहास आहे. त्या इतिहासात मराठी रंगभूमीचे मोठे योगदान आहे. गुजराती, बंगाली रंगभूमीप्रमाणे मराठी रंगभूमीने स्वतःचे एक अस्तित्व जपले आहे. त्या अस्तित्वाच्या जोरावर आजही मराठी रंगभूमी उभी आहे. मराठी नाटककारांनी रंगभूमीची ही परंपरा जपली, त्यात ज्येष्ठ नाटककार दिवंगत प्र. ल. मयेकर यांचा सिंहाचा वाटा आहे. मयेकर हे जागतिक कीर्तीचे नाटककार होते. त्यांनी कधीच एका साच्यातील नाटके लिहिली नाहीत. त्यांच्या प्रत्येक नाटकात एक वेगळेपण आहे. ‘तक्षकयाग’सारखं नाटक तर दुसरीकडे ‘पांडगो…’सारखं नाटक लिहिणारे ते प्रतिभावंत नाटककार होते. त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण नाटकांनी आज आपली मराठी रंगभूमी समृद्ध झाली आहे. अशा नाटककाराला नाटय़ क्षेत्रातला सर्वोत्तम सन्मान मिळायला हवा होता. 18 ऑगस्ट हा प्र. ल. मयेकर यांचा स्मृतिदिन. त्यांचे 18 ऑगस्ट 2015 ला निधन झाले.

पूर्वी गणपतराव बोडस हे मोठे अभिनेते होते. त्या काळात नाटय़ लेखक गणपतरावांना डोळ्यासमोर ठेऊन नाटक लिहित असत. प्र. ल. मयेकरांनीही कलाकाराला नजरेसमोर ठेवून नाटकं लिहिली आहेत. ‘रानभूल’सारख्या नाटकात विनय आपटे यांना नजरेसमोर ठेवून ती बहुआयामी भूमिका लिहिली होती. मयेकरांच्या नाटकातील संवाद दर्जेदार असत. त्यांनी प्रत्येक नाटक लिहिताना वेळ घेतला. व्यावसायिक नाटक लिहिताना त्यांनी भाराभर नाटकं लिहिली नाहीत. प्र. ल. मयेकर यांची आणि माझी ओळख दूरदर्शनच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली. सुरेंद्र भाटकर यांचे ते साडू होते. त्यामुळे माझी आणि मयेकरांची मैत्री अधिक घट्ट झाली.

मयेकर हे स्वाभिमानी होते. ‘मोडेन, पण वाकणार नाही’ असा त्यांचा मराठी माणसाचा स्वाभिमान होता. मयेकरांनी स्वतःचे मार्केटिंग केले नाही. ते सशक्त नाटककार होते. त्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमी गाजवली. मात्र ते त्या झगमगाटाच्या वलयात रमले नाहीत. ते कायम सामान्य माणसाचे आयुष्य जगले होते. मयेकरांचा नाटकाचा प्रवास कामगार नाटय़ स्पर्धा आणि राज्य नाटय़ स्पर्धेतून झाला. जरी त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर यश मिळवले तरी त्यांची राज्य नाटय़ आणि कामगार नाटय़ स्पर्धेशी नाळ कायम जोडलेली होती. यशस्वी व्यावसायिक नाटककार होऊनही त्यांनी शेवटपर्यंत राज्य नाटय़ स्पर्धेसाठी नाटके लिहिली. त्यांच्या एकांकिकाही खूप गाजल्या. चित्रपटांनीही यश मिळवले. ‘प्र. ल.’ हा नाटककारांचा ब्रॅण्ड होता. मयेकरांची नाटकं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती. मोहन वाघ यांच्यासारख्या निर्मात्यांनी त्यांची ताकद ओळखली होती.

प्र. ल. मयेकर एक चालतं-बोलतं विद्यापीठ होतं. मयेकर मराठी रंगभूमीला फक्त दर्जेदार संहिता देऊन थांबले नाहीत. त्यांनी चांगले अभिनेते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ घडविले. बेस्ट कला-क्रीडा मंडळाच्या नाटकातील कलाकारांना त्यांनी फक्त पारितोषिक जिंकायला शिकवलं नाही, तर अभिनयाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहायला शिकवले. बेस्टमधील नोकरी सोडून अनेकांनी रंगभूमीवर पाय ठेवला आणि आज त्याच रंगभूमीवर ते बेस्ट ऍक्टर म्हणून पाय रोवून उभे आहेत. विनय आपटे, अरुण नलावडे, अविनाश नारकर अशी अनेक नावं घेता येतील. मयेकरांनी अनेक कलाकार घडवले. कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यातून कलाकार घडावेत या उद्देशाने राज्य नाटय़ स्पर्धा सुरू करण्यात आली होती. तो उद्देश मयेकरांनी सफल केला. कारण राज्य नाटय़ स्पर्धेत सादर झालेले नाटक पुढे व्यावसायिक रंगभूमीवर येत होते. त्याच नाटकातील कलाकार पुढे चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसू लागले. हे एका नाटककाराचे यश आहे. मयेकराचं वाचन प्रचंड होतं. उत्तम अभिनेता, दिग्दर्शक होण्यासाठीसुद्धा वाचन केले पाहिजे असे ते नेहमी सांगत. मयेकरांची राहणी साधी होती. सेवानिवृत्तीनंतर ते रत्नागिरीत राहिले होते. त्यांना गावची ओढ होती. व्यावसायिक रंगभूमीवरचा नाटककार असूनही ते ग्रामीण नाटकांना स्वतः हजेरी लावून स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देत असत.

प्र. ल. मयेकर यांच्यासारख्या थोर नाटककाराचा गौरव होणे आवश्यक आहे. सरकारने त्यांच्या योगदानाची दखल घ्यायला हवी असे मला वाटते. प्र. ल. मयेकर नाटय़ अकादमी उभी राहावी याकरिता राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी याबाबत पाठपुरावा करावा.

4 एप्रिल 2021 रोजी प्र. ल. मयेकर यांची 75 वी जयंती असेल. त्या निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेने मयेकरांच्या सर्व नाटकांवर आधारित एक दिवसाच्या परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित करावा.