
विवोसोबतचा करार मोडीत काढल्यानंतर 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी नव्या प्रायोजकाचा शोध बीसीसीआयला घ्यावा लागत आहे. आयपीएलचे टायटल प्रायोजकत्व मिळवण्यासाठी टाटा, अनअॅकॅडमी, पतंजली, बायजू, रिलायन्स जिओ व अॅमेझॉन या कंपन्यांमध्ये चुरस आहे. बीसीसीआयकडून आज यांच्यापैकी एका कंपनीच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. या नव्या कंपनीसोबत बीसीसीआय चार महिन्यांचा करार करील.
300 कोटींचा करार होऊ शकतो
कोरोनामुळे बाजारात मंदी आली आहे. त्यामुळे कमी रकमेसाठी हा करार करण्यात येऊ शकतो. बीसीसीआयला विवोसोबत केलेल्या करारानुसार वर्षाला 440 कोटी रुपये मिळत होते, पण आता ही रक्कम कमी होऊन 300 कोटींपर्यंत आली आहे. कदाचीत ती वाढून 350 कोटींपर्यंतही जाऊ शकते.
… म्हणून टायटल स्पॉन्सरला जास्त पैसे मोजावे लागतात
ह बीसीसीआयकडून सेंट्रल व टायटल स्पॉन्सरशिपसाठी प्रायोजक शोधण्यात येत आहेत. सेंट्रल स्पॉन्सरशिपसाठी देशी कंपन्यांमध्ये चढाओढ लागते, पण आयपीएलमधील सेंट्रल स्पॉन्सरला जर्सीशी निगडित असलेला अधिकार मिळत नाही. टायटल स्पॉन्सरला जर्सीसोबतच लढत संपल्यानंतर प्रेझेंटेशन एरिया, डग आऊटमधील बॅकड्रॉप, बाऊंड्रीचा विभाग यावर स्थान मिळते. त्यामुळे टायटल स्पॉन्सरला सेंट्रल स्पॉन्सरपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात.
टाटा कंपनीला पसंती
टाटा कंपनी आयपीएलची अधिकृत पार्टनर आहे. त्यामुळे आगामी स्पर्धेसाठीच्या प्रायोजक रेसमध्ये हीच कंपनी अग्रस्थानावर असणार आहे. तसेच टाटा ही प्रतिष्ठित कंपनी आहे. आयपीएल व टाटा यांचा मिलाफ प्रेक्षकांनाही आर्किषत करील असा विश्वास ब्रॅण्ड स्ट्रेटेजिस्ट हरीश बिजूर यांनी व्यक्त केला.
असोसिएट स्पॉन्सरसाठीही प्रयत्न
विवोचा करार मोडल्यामुळे बीसीसीआयला मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी बीसीसीआय टायटल स्पॉन्सरसह असोसिएट स्पॉन्सरही शोधत आहे. त्यामुळे ज्या कंपनीला टायटल स्पॉन्सर होता येणार नाही, त्यांना असोसिएट स्पॉन्सरसाठी आपली दावेदारी करता येऊ शकते.






























































