
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर हल्ला करणारा तरुण अजिंक्य टेकाळे हा कारागृहातून फरार झाल्याची घटना आज दुपारी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 8 तासात आरोपीस जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान कळंब तालुक्यातील पाडोळी येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अजिंक्य टेकाळे या युवकाने चाकूने हल्ला केला होता. सध्या तो धाराशिव येथील कारागृहात होता. आज दुपारच्या सुमरास तो कारागृहातून फरार झाला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, आनंद नगर पोलिस ठाणे, धाराशिव ग्रामीण पोलिस तसेच शिराढोण पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने तपासाची चक्रे फिरवून अजिंक्य टेकाळे यास सव्वा दहाच्या सुमारास तालुक्यातील शिंगोली येथील हनुमान मंदिर परिसरातून पुन्हा ताब्यात घेतले आहे.






















































