पश्चिम रेल्वेला प्लॅस्टिक क्रशिंग मशिनद्वारे कमाई, 16 स्थानकांवर पाच वर्षांत 82,985 महसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेने प्लास्टीक बंदीतून आता कमाईचा नवा रस्ता शोधून काढला आहे. रेल्वे स्थानकांवर बसविण्यात येणार्या प्लास्टीक बॉटल क्रशिंग मशिनद्वारे पश्चिम रेल्वेला तगडी लायसन्स फि मिळणार आहे. मुंबई सेंट्रल येथे अशा तीन मशिनचे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी विभागीय व्यवस्थापक जीव्हीएल सत्य कुमार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने ‘नॉनफेअर रेव्हेन्यू’ अंतर्गत 16 रेल्वे स्थानकांवर अशा 25 प्लास्टीक बॉटल क्रशिंग मशिन बसविण्यासाठी टेंडर काढले आहे. या प्रकल्पातून लायसन्स फिद्वारे पाच वर्षांत 82,985 रूपयांचा महसूल मिळणार आहे. या मशिनची किंमत प्रत्येकी साडे तीन लाख रूपये असल्याने पश्चिम रेल्वेची एकप्रकारे 87 लाख रूपयांची बचतही होणार आहे.

‘नॉनफेअर रेव्हेन्यू’ योजनेअंतर्गत पश्चिम रेल्वेच्या 25 स्थानकांत प्लास्टीक क्रशिंग मशिनसाठी टेंडर काढण्यात आले असून मुंबई सेंट्रल स्थानकापासून तीन मशिनद्वारे या प्रकल्पाची सुरूवात 15 ऑगस्टपासून झाली आहे. त्यानंतर चर्चगेट चार, दादर, वांद्रे टर्मिनस, अंधेरी,बोरीवली येथे प्रत्येकी दोन तर लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, मालाड, कांदिवली, नालासोपारा, आणि विरार येथे प्रत्येकी एक मशिन बसविण्यात येणार आहेत.

दुसऱया टप्प्यात 29 लाखांची कमाई
पश्चिम रेल्वे दुसऱया टप्प्यात आणखी 23 स्थानकांत 33 प्लास्टीक बॉटल क्रशिंग मशिन बसविण्याचे टेंडर निघणार असून त्यामुळे वर्षाला 5 लाख 28 हजारांचा महसूल तर पाच वर्षांत 29 लाख 20 हजार 967 रूपयांचा महसुल लायसन्स फिद्वारे पश्चिम रेल्वेला मिळणार आहे.