जम्मू-कश्मीरमध्ये चार दिवसांत दुसरा अतिरेकी हल्ला; बारामुल्लात तीन जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरात रक्तरंजित हिंसाचार सुरुच आहे. बारामुल्ला येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे देन जवान आणि एक पोलीस शहीद झाले.

बारामुल्ला येथील व्रेरी परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू-कश्मीर पोलिसांचा जॉईंट नाका आहे. या परिसरात दबाव धरून बसलेल्या तीन दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. त्यात दोन जवान आणि एक पोलीस शहीद झाले, अशी माहिती पोलीस महासंचालक विजयकुमार यांनी दिली. सीआरपीएफने या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

हल्ले वाढले
कश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. 14 नौगाम बायपासजवळ पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात दोन पोलीस शहीद झाले होते. 15 ऑगस्टलाही पोलीस पथकावर हल्ला केला होता.

लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा
बारामुल्ला येथील हल्ल्यानंतर सीआरपीएफ जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आणि लष्कर-ए-तोयबाचा कमांडर, दहशतवादी सज्जाद ऊर्फ हैदरसह आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. या परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याची माहिती असून, रात्री उशिरापर्यंत चकमक सुरु होती.