
लातूर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून रिमझिम पाऊस सुरु आहे. सोयाबीनची जिल्ह्यात चांगली वाढ झालेली असून मुग आणि उडीद पिकास याचा फटका बसण्याची चिन्हे दिसून येत आहेत. सतत पाऊस होत असल्याने शेतातील मशागतीची कामे बंद पडलेली असून पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. लातूर जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघूप्रकल्प आणि गावतलावात अपेक्षित पाणीसाठा अजूनही झालेला नाही. जिल्ह्यात सध्या केवळ 11.60 टक्के उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे. समाधानाची बाब म्हणजे लातूर शहराचा पाणीप्रश्न काही प्रमाणात मिटलेला आहे.
लातूर जिल्ह्यात यावर्षी प्रारंभापासून चांगला पाऊस झालेला आहे. यावर्षी प्रथमच जून महिन्यात पेरणी झालेली आहे. मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होत आहेत. मुग, उडीद कांही प्रमाणात चांगला आलेला असून आता अधिक पावसाने त्याचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोयाबीनला पावसाचा चांगला फायदा झालेला आहे. सोयाबीनचे जिल्ह्यात मोठे क्षेत्र आहे. सोयाबीनची उंची वाढत आहे, पावसामुळे फवारणी, कोळपणी, खुरपणीची कामे बंद झालेली आहे. सध्या जिल्ह्यात पिकांवर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांनी फवारणी करावी अशा सुचना दिल्या जात आहेत.
लातूर जिल्ह्यास पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात सध्या मृतसाठ्याइतके म्हणजे 44.584 दशलक्षघन मीटर पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे लातूर शहरासह औद्योगिक वसाहती आणि काही गावांचा पाणीप्रश्न काही महिन्यांसाठी सुटलेला आहे. या प्रकल्पात अजूनही उपयुक्त पाणीसाठा झालेला नाही. त्याचप्रमाणे निम्न तेरणा प्रकल्पामध्ये मृतसाठ्याइतकेच म्हणजे 29.967 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झालेला आहे. याही प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा झालेला नाही.
लातूर जिल्ह्यात 8 मध्यम प्रकल्प आहेत त्यामधील केवळ तीन मध्यम प्रकल्पातच उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे. त्यामध्ये रेणापूर मध्यम प्रकल्प रेणापूर येथे 11.70 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. तर तिरु मध्यम प्रकल्पामध्ये 19.62 टक्के उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे. देवर्जन मध्यम प्रकल्पामध्ये 6.90 टक्के पाणीसाठा झालेला आहे. जिल्ह्यातील उर्वरित तावरजा मध्यम प्रकल्प लातूर, व्हटी मध्यम प्रकल्प रेणापूर, साकोळ मध्यम प्रकल्प शिरुर अनंतपाळ, घरणी मध्यम प्रकल्प शिरुर अनंतपाळ, मसलगा मध्यम प्रकल्प निलंगा या पाच मध्यम प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा झालेला नाही. लातूर जिल्ह्यामध्ये 132 लघू प्रकल्प आहेत. या त्यामध्ये सध्या केवळ 24.43 टक्के उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे. लातूर जिल्ह्यातील प्रकल्पात पाणीसाठा होण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या पावसांची आवश्यकत आहे. आजपर्यंत झालेला पाऊस पिकांसाठी योग्य ठरलेला आहे. परंतु पाणीटंचाई दूर होण्यासाठी अधिक पावसाची आवश्यकता आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये जून ते जुलै या कालावधीत सरासरी 323.3 मि.मी.सरासरी पाऊस पडतो. यावर्षी 338 मि.मी. सरासरी पाऊस या काळात झालेला आहे. ऑगस्ट महिण्यात आपर्यंत साधारणपणे 111.2 मि.मी.सरासरी पाऊस होत असतो यावर्षी मात्र ऑगस्ट महिण्यात आजपर्यंत 60.2 मि.मी. सरासरी पाऊस झालेला आहे. लातूर तालुक्यात आजपर्यंत 44.2 टक्के पाऊस झालेला आहे. औसा तालुक्यात 53.6 टक्के पाऊस झालेला आहे. अहमदपूर तालुक्यात 55.5 टक्के, निलंगा तालूक्यात 54.5 टक्के, उदगीर तालुक्यात 52.9 टक्के, चाकूर तालुक्यात 42.5 टक्के, रेणापूर तालुक्यात 49.3 टक्के, देवणी तालुक्यात 57.3 टक्के, शिरुर अनंतपाळ तालूक्यात 45.9 टक्के, जळकोट तालुक्यात 62.5 टक्के पाऊस झालेला आहे.




























































