
मुंबई येथून देवली (मालवण) येथे आलेल्या एका कुटुंबातील 17 वर्षीय मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्या मुलाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची कोरोना तपासणी केली असता दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यानां जिल्हा रुग्णालयात (कोविड सेंटर) दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.
4 ऑगस्ट रोजी मुंबई येथील 6 जणांचे कुटुंब मालवणातील खालची देवली येथील घरी आले होते. त्यांनंतर त्यांच्या 17 वर्षीय मुलाला त्रास होऊ लागल्याने त्याची कोरोना तपासणी केली असता अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला मधुमेह असल्याने त्यावरही उपचार सुरू होते. मुलाची तब्बेत अधिक खालावली त्यातच सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. मालवण तालुक्यातील हा कोरोनाचा दुसरा बळी ठरला. तळगाव येथील एका व्यक्तीचा याआधी कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
मालवणात 36 कोरोनामुक्त
मालवण तालुक्यात आतापर्यंत 62 कोरोना पॉझिटिव्ह सापडले. यापैकी 36 रुग्ण बरे होऊन घरी परतले. 2 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 24 रुग्णावर जिल्हा रुग्णालय व मालवण कुंभारमाठ पॉलिटेक्निक येथील कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी कुबेर मिठारी यांनी दिली.
कोविड केअर सेंटर येथे 13 जणांवर उपचार सुरू
मालवण कुंभारमाठ पॉलिटेक्निक येथे 50 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी लक्षणे नसलेल्या अथवा सौम्य लक्षणे असलेल्या पॉझिटिव्ह रुगणांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ठेवून उपचार केले जातात. याठिकाणी सध्या 13 रुग्ण आहेत. बरे झालेल्या शहरातील दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.
संपर्कातील 30 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
मालवणात गेल्या काही दिवसात जे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यांच्या थेट संपर्कातील व्यक्तींची स्वाब तपासणी मालवण ग्रामीण रुग्णालयात केली जात आहे. काल केलेल्या तपासणीत 30 व्यक्तींचे कोरोना रॅपिड टेस्ट अहवाल निगेटिव्ह आले. अशी माहिती डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.




























































