
>> पूर्वा शिंदे, अभिनेत्री
‘युवा डान्सिंग क्वीन’ हा आमचा रियॅलिटी शो झी युवा वाहिनीवर सुरू होता. त्याच्या अंतिम पेâरीपूर्वी आम्हाला दहा दिवसांचा ब्रेक दिल्याने मी पुण्यातील घरी होते. या दरम्यान लॉकडाऊन झाले आणि शोची अंतिम फेरी रखडली. लॉकडाऊनच्या सुरुवातीला सुट्टी मिळाली म्हणून छान वाटले. घरात रिकामे बसून राहायची सवय नसल्याने काय करायचे याचे थोडेसे टेन्शनही होते. ज्या गोष्टीतून आनंद मिळतोय त्या करण्यावर भर दिला. घरात बNयाच दिवसांनी छान वेळ घालवला. घरकामात आईला मदत केली, नवनवीन रेसीपीज ट्राय केल्या, सिनेमे-वेबसिरीज पाहिल्या. शाळा-कॉलेजपासून असलेली ड्रॉर्इंगची आवड जपली. टेन्शनमधून सुटका करून घेण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी मला योगाची मोठी मदत झाली.
कोरोनाच्या संकटाने माणसाला खूप गोष्टी शिकवल्या. मुळात माणूस कधीच समाधानी नसतो. त्याचे एक स्वप्न पूर्ण झाले की दुसरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू असते. कामाच्या मागे तो सतत धावत असतो. लॉकडाऊन दरम्यान आपले घर, आपले कुटुंब आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे सगळ्यांना कळले. लांबचे नातेवाईकही फोनवरून प्रकृतीची विचारपूस करायचे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळा म्हटलं की साथीचे आजार हे आलेच. लॉकडाऊनदरम्यान घरी राहणे, बाहेरचे खाणे टाळणे, घरासह आजूबाजूला स्वच्छता बाळगणे अशा हेल्दी लाईफस्टाईलमुळे पावसाळा संपत आला तरी लोक साथीच्या आजारापासून दूर आहेत. आपण आता जशी स्वत:ची काळजी घ्यायला शिकलोय तशीच काळजी उद्या कोरोना गेल्यावरही लोकांनी घेतली पाहिजे. त्यामुळे आनंदी राहा, हसत राहा आणि हेल्दी राहा!!
नवी सुरुवात…
लॉकडाऊननंतर हळूहळू सर्व गोष्टी सुरळीत होतायत. मुंबईत सध्या मी ‘चला हवा येऊ द्या- लेडिज जिंदाबाद’चे शूटिंग करतेय. कोरोनाच्या संकटात लोकांचे टेन्शन दूर करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याची नवी जबाबदारी मला या शोच्या माध्यमातून मिळालीय. अभिनय, डान्सनंतर आता मी कॉमेडी करताना दिसणार आहे. नव्या जबाबदारीमुळे मी खूप उत्सुक आहे. सेटवर आम्ही सर्व प्रकारची काळजी घेतोय. सोशल डिस्टन्सिंग राखतोय, त्यामुळे काम करताना सुरक्षित वाटतेय. वारंवार गरम पाणी पिणे, मल्टीविटॅमिनच्या गोळ्या घेणे, स्टीम घेणे असे घरगुती उपाय मी करतेय. प्रत्येकाने कामासाठी बाहेर पडताना आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.






















































