औष्णिक वीज केंद्रांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्रांमुळे मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणामुळे पर्यावरणात बदल होत आहेत, ते टाळण्याकरिता ठोस उपाययोजना कराव्यात असे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. पॅरिस करारानुसार औद्योगिकरणामुळे पर्यावरणातील होणारे बदल टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीच्या वीज केंद्रातून होणारे प्रदूषण कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्याची दखल घेत प्रदूषण कमी करण्याबाबत निश्चित उपाययोजना केल्या जातील असे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले.

राखेचा वापर रस्ते बांधणी, सिमेंट कारखान्यात करणार
औष्णिक वीज प्रकल्पातून मोठय़ा प्रमाणात राख उत्सर्जित होते. त्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सदर राखेचा वापर रस्ते बांधणी आणि सिमेंट कारखान्यात करण्याबाबतचे धोरण तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी ऊर्जामंत्र्यांनी ऊर्जा विभागाला दिले. दरम्यान राखेच्या वापराबाबत राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सिमेंट उद्योगांसोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत पर्यावरण मंत्रालयही सहभागी होईल असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.