
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने पाटण्यात दाखल करण्यात आलेली FIR योग्य होती असे आदेशात म्हटल्याचे ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाने या आदेशाला आव्हान देण्यास नकार दिल्याचेही या वत्तसंस्थेने म्हटलं आहे.
सुशांत सिंह राजपूत की मौत का मामला: सुप्रीम कोर्ट ने कहा कि पटना में दर्ज एफआईआर सही थी। महाराष्ट्र राज्य ने आदेश को चुनौती देने से इनकार किया।
— ANI_HindiNews (@AHindinews) August 19, 2020
सुप्रीम कोर्ट ने अभिनेता सुशांत सिंह राजपूत मौत मामले में सीबीआई जांच के आदेश दिए। pic.twitter.com/qviQRE6XnY
— ANI_HindiNews (@AHindinews) August 19, 2020
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय ऐवजी महाराष्ट्र पोलिसांकडे द्यावा, या मागणीसाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद पूर्ण झाला होता. या युक्तिवादानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखीव ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयात 11 ऑगस्ट रोजी म्हणजेच गेल्या मंगळवारी झालेल्या सुनावणीत अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या बाजूने ऍड. श्याम दिवान, महाराष्ट्र सरकारच्या वतीने ऍड. अभिषेक मनु सिंघवी, बिहार सरकारकडून ऍड. मनिंदर सिंह आणि केंद्र सरकारच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली होती. या चारही पक्षांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.
या सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआय करु शकते, यावर आपली भूमिका मांडली होती. ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरु केलेली आहे. एखाद्या केंद्रीय दलाकडून चौकशी सुरु असल्यास दुसरे केंद्रीय दल या प्रकरणाची चौकशी करु शकते, असा दावा त्यांनी न्यायालयासमोर केला होता. तुषार मेहता यांनी मुंबई पोलीस करीत असलेल्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणे गरजचे असल्याचे मत तुषार मेहता यांनी न्यायालयात मांडले होते.
11 तारखेला झालेल्या सुनावणीच्यावेळी सीबीआय चौकशीला विरोध करताना ऍड. अभिषेक मनु सिंघवी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलीस गरजेपेक्षा जास्तच प्रयत्न करीत आहेत असे म्हटले होते. हा सर्व प्रकार कायद्याच्या आणि सीआरपीसीच्या नियमांच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर या प्रकरणाची चौकशी सीबीआयला देणे म्हणजे एक प्रकारे लोकशाहीच्या मुळावर घाव असल्याचा घणाघात त्यांनी केला.
या सुनावणी दरम्यान रिया चक्रवती हिचे वकील श्याम दिवाण यांनी रियाची बाजू न्यायालयासमोर मांडली होती. रियाचे सुशांत सिंह राजपूतवर प्रेम होते. त्याच्या निधनाने तिला जब्बर धक्का बसला असून आता तिला यात अडकविले जात असल्याचे त्यांनी यावेळी रियाच्यावतीने न्यायालयासमोर सांगितले. तर आपल्याला मुंबई पोलिसांच्या चौकशीवर विश्वास असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी याप्रकरणी 56 जणांची चौकशी केली आहे. चौकशी पूर्ण झाली नसली तरी ती योग्य दिशेने सुरु असल्याचा दावा दिवाण यांनी यावेळी केला होता. सुशांत सिंह यांचे वडील केके सिंह हे आपल्या काही नातेकाईवांकडून या केसवर दबाव टाकत असल्याचा आरोप रिया हिने यावेळी केला होता. विशेष म्हणजे, रिया हिच्या वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले की, या प्रकरणाची चौकशी कोणीही केल्यास आपल्याला हरकत नाही. परंतु हा प्रकरणाचा तपास हा महाराष्ट्रात झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.



























































