ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाल्यास टेबल टेनिसमध्ये क्रांती येईल, मधुरिका पाटकरचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जयेंद्र लोंढे | मुंबई

अभिनव बिंद्रा, विजय कुमार, गगन नारंग, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, सुशील कुमार, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक, मेरी कोम, विजेंदर सिंग या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये पदकांवर मोहोर उमटवत हिंदुस्थानात आपापल्या खेळाला वैभव मिळवून दिले. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाल्यास हिंदुस्थानात टेबल टेनिस या खेळाचीही क्रांती निर्माण होईल. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक जिंकल्यानंतर युवा खेळाडूंच्या संख्येत वाढ झालीय, तर मग ऑलिम्पिकमध्ये यश मिळाल्यानंतर काय होईल? हा खेळ प्रगतीपथावर आरूढ होईल, स्पॉन्सर जोडले जातील, आणखी सवलती मिळतील, असंख्य युवक या खेळाकडे करीअर म्हणून पाहतील, या खेळाचा प्रचार व प्रसार जास्त प्रमाणात होईल. असा विश्वास व्यक्त केला आहे महाराष्ट्राची मराठमोळी टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकर हिने. अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आल्यानंतर दैनिक ‘सामना’ने तिच्याशी साधलेला हा संवाद.

अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झालीय. याप्रसंगी तुझ्या मनातील भावनांबद्दल काय सांगशील?

आतापर्यंत मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील प्रतिष्ठsचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला होता, पण अर्जुनच्या रूपाने पहिल्यांदाच अखिल हिंदुस्थानी स्तरावरील पुरस्कार मिळालाय. याआधी 2017 व 2019 सालामध्ये या पुरस्कारासाठी अर्ज केला होता. त्यावेळी मिळाला नाही, पण तिसऱया प्रयत्नात यश मिळाले. याच वेळी आता माझ्या खांद्यावरील जबाबदारी आणखी वाढलीय. देशातील असंख्य युवा खेळाडू माझ्याकडे बघून टेबल टेनिस या खेळाकडे वळतील, मला रोल मॉडेल समजतील. त्यामुळे यापुढील प्रवास आणखी मोठा असणार आहे.

आतापर्यंतच्या कारकीर्दीत मिळवलेल्या यशाचे रहस्य कोणते?

– टेबल टेनिसमध्ये मिळवलेल्या यशाचा चेहरा माझा आहे, पण यामागे कष्ट असंख्य लोकांचे आहेत. माझे व पती ओमकार यांचे कुटुंब, महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशन, ठाणे जिल्हा असोसिएशन, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया, साई, सरकार, डाएटिशियन डॉ. नितीन पाटणकर, शिल्पी अरोरा, जिम ट्रेनर किशोर पुजारी, विकास म्हात्रे, फिजिओथेरेपिस्ट डॉ. प्रांजली जोशी, स्ट्रेंग्थ ऍण्ड कंडिशनिंग कोच प्राची भोसले, योगा टीचर सुनंदा जोशी, विद्या कुंटे, मेंटल ट्रेनर सानिका दिवेकर, हिंदुस्थानी संघाचे सर्व प्रशिक्षक, सहकारी, बुस्टर क्लबचे सर्व सदस्य या सर्वांच्या सहकार्यामुळे मला टेबल टेनिसमध्ये मोठी झेप घेता आली आहे.

हिंदुस्थानात टेबल टेनिस या खेळात कोणता बदल घडून आलाय…

काही वर्षांपूर्वी टेबल टेनिसमध्ये हिंदुस्थानी खेळाडू मेहनत करायचे, पण निकाल काही मनाजोगता लागत नव्हता. गेल्या काही वर्षांमध्ये चित्र बदलले आहे. कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई गेम्समध्ये हिंदुस्थानी संघाने चमकदार कामगिरी केलीय. त्यामुळे खेळाडूंमध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण झालाय. तसेच सरकारकडूनही पदोपदी सहकार्य मिळत आहे. स्कॉलरशिप, नोकऱयाही मिळू लागल्या आहेत. युरोपियन देशांमधील खेळाडूंना कारकीर्द संपल्यानंतर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सतावतो. हिंदुस्थानात खेळाडूंना नोकरीची हमी असल्यामुळे तेथील खेळाडू आम्हाला नशीबवान समजतात.

टेबल टेनिससाठी लागणाऱया सुविधा आपल्याकडे आहेत का?

नक्कीच आहेत. ऍकॅडमीही भरपूर आहेत. मी गेली 27 वर्षे शैलजा गोहाड मॅडम यांच्याकडे या खेळाचे मार्गदर्शन घेतेय. त्यांच्या बुस्टर  क्लबमध्ये कमीत कमी दरामध्ये खेळाडूंना शिकवले जाते. मीही ‘शिरोज’ नावाने फाऊंडेशन सुरू केलीय. याद्वारे आम्ही शाळांमध्ये जाऊन खेळांच्या शिबिराच्या आयोजनाबाबत सांगणार आहोत. सुरुवातीला मुलींसाठी ही योजना आखलीय. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना खेळांची गोडी लागावी यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे.