बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोना होतो ? ICMR ने दिले उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना त्याची परत लागण होत असल्याच्या काही घटना निदर्शनास आल्याचे कोव्हीड टास्क फोर्सच्या काही सदस्यांनी म्हटल्याचे सांगितले जात होते. यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतरही आपल्याला कोरोना होणार का अशी भीती रुग्णांना वाटायला लागली होती. याबाबत वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच ICMR ने माहितीपूर्ण खुलासा केला आहे. परिषदेच्या निरीक्षण गटातील सदस्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

वैद्यकीय संशोधन परिषदेच्या निरीक्षण गटातील सदस्यांनी सांगितले आहे की बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा करोना होत नाही. मंगळवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही काही रुग्णांकडून आपल्याला पुन्हा श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या आणि इतर समस्यांबद्दल ऐकायला मिळाल्याचे म्हटले होते. त्यांनी राज्याच्या कृती दलाला याबाबत आयसीएमआरकडून मार्गदर्शन मिळावे यासाठी विनंती करण्यास सांगितले होते. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की वैद्यकीय संशोधन परिषदेच्या निरीक्षण गटातील सदस्याने कोरोनामुक्त रुग्णाला पुन्हा त्याची लागण होत असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे सांगितले आहे. गिरधरा बाबू या सदस्याने म्हटलंय की जागतिक साथरोगतज्ज्ञांचेही हेच मत आहे की कोरोनाची पुन्हा लागण होत नाही. कोरोनामुक्त रुग्णांकडून ज्या तक्रारी येत आहेत त्याबाबत अधिक माहिती घेणं गरजेचं असून त्यांची तपासणी देखील गरजेची असल्याचं बाबू यांनी म्हटलं आहे.

राज्यात 9 हजार रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात बुधवारी दिवसभरात कोरोनाचे 13 हजार 165 नवे रुग्ण आढळले आहेत. 9011 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण 71 टक्क्यांवर गेले आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण 4 लाख 46 हजार 881 रुग्ण बरे झाले असून सध्या 1 लाख 60 हजार 413 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात बुधवारी 346 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यूदर 3.35 टक्के एवढा आहे.

मुंबईत दिवसभरात 1,132 नवे रुग्ण; 46 जणांचा मृत्यू, 864 कोरोनामुक्त

मुंबईत बुधवारी दिवसभरात कोरोनाचे 1,132 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 46 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 864 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 1 लाख 6,057 वर पोहोचली आहे. मुंबईत 46 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 7 हजार 265 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 89 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 17 हजार 917 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 6 लाख 71 हजार 888 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 31,542 वर पोहोचली आहे. दरम्यान, धारावीत बुधवारी 4 रुग्ण सापडले असून माहीममध्ये 26 तर दादरमध्ये 39 रुग्ण सापडले आहेत.