ठसा – सुधाकर परिचारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  भगवान परळीकर 

एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या निधनाने एक कृषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे. सहकार, बँकिंग व राजकीय क्षेत्रातील एक तज्ञ म्हणून ते परिचित होते. सुधाकर परिचारक हे कुशल प्रशासक व लोकाभिमुख राजकारणी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात होते. राजकारणाला त्यांनी रचनात्मक कार्याचा धर्म मानून सहा दशकांपेक्षा अधिक काळ या क्षेत्रात घालविला. निष्कलंक, प्रामाणिक, दूरदृष्टी असलेला व विधायक कामाला प्राधान्य देणारा नेता अशी त्यांची ख्याती होती.

पंढरपूर अर्बन बँकेचा कारभार त्यांनी सचोटीने पाहून बँक प्रगतीच्या शिखरावर नेली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सहकारी संस्थांना मदतीचा हात देऊन कृषी व औद्योगिक विकासात मोलाचा वाटा उचलला. मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथील भीमा सहकारी साखर कारखाना तत्कालीन संचालक मंडळाच्या गैरनियोजनामुळे कर्जात बुडाला होता. 1986 मध्ये शासनाने या कारखान्यावर प्रशासकीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करून हा कारखाना त्यांच्या ताब्यात दिला. त्यांनी पारदर्शी कारभार करून साखर कारखाना सभासदांच्या सहकार्याने पूर्ण क्षमतेने चालवून कारखान्याला कर्जमुक्त करण्याची किमया केली.ऊस उत्पादकांनाही चांगला भाव मिळाला. श्रीपूरच्या खासगी साखर कारखान्याचे सहकारीकरण करून त्यांनी पांडुरंग सहकारी साखर कारखाना सुरू करून या कारखान्याला नावलौकिक मिळवून दिला.

पंचायत राज समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्याला लोकाभिमुख बनविण्याचा प्रयत्न केला होता. 1978 मध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनता पक्षातर्फे निवडणूक लढविली, परंतु काँग्रेसचे औदुंबला अण्णा पाटील यांच्याकडून ते पराभूत झाले होते. पुढे 1985 पासून सलग पाचवेळा निवडून येऊन 2009 पर्यंत पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली होती. 20009 मध्ये माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणी निवडणूक लढवायची असा वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी पंढरपूरची आपली जागा विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी मोठय़ा मनाने मोकळी करून देऊन पक्षातील वाद सोडवला होता. अलीकडेच त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना यश आले नाही.

सुधाकर परिचारक हे सत्तेवर असोत अथवा नसोत, त्यांच्या पंढरपूर शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरालगत असलेल्या वाडय़ातील ओसरी कायम प्रश्न घेऊन आलेल्या सामान्य नागरिकांच्या गर्दीने भरलेली असायची. सुधाकरपंत यांच्याविषयी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्य़ांना आदर असल्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटत असत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, देवेंद्र फडणवीस आदी पंढरपूरला आल्यानंतर पंतांच्या वाडय़ावर आवर्जून हजेरी लावायचे. राजकारणविरहित गप्पा रंगायच्या आणि पुरणपोळीचा आस्वाद घेतला जायचा. लोकहितासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या सुधाकरपंत यांच्या निधनाने पंढरपूर नव्हे, तर संपूर्ण सोलापूर जिह्याची मोठी हानी झाली आहे. नेहमी लोकांसाठी धडपड करणारे सुधाकरपंत परिचारक खऱ्य़ा अर्थाने लोकनेते होते. पंढरपूरच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असायचे.

पंढरपूरमध्ये येणाऱ्य़ा भाविकांसाठी पंढरपूरच्या नदीकाठी घाट असावा, पालखी मार्गाची सुधारणा व्हावी, येणाऱ्य़ा भाविकांना तसेच पंढरपूरमध्ये राहणाऱ्य़ांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी चांगले काम केले आहे. अनेक संस्था त्यांनी निर्माण केल्या. साखर कारखाने उभे केले. शरद पवार यांच्या सोबत त्यांनी काम केले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांतील नेते, कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क होता. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी समाजाची सेवा केली. राजकारणातील संत म्हणूनच त्यांची ओळख आहे. त्यांचे समाजोपयोगी कार्य सोलापूरकर नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र कायम लक्षात ठेवेल.