साईच्या केंद्रात अन् घरी राहून खेळाडू स्वीकारणार प्रतिष्ठेचा पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा 29 ऑगस्ट रोजी पार पडणारा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम राष्ट्रपती भवनात होणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता या पुरस्कारांचे वितरण व्हर्च्युअल म्हणजेच ऑनलाइन करण्यात येणार आहे. त्यामुळे विजेत्या खेळाडूंना घरी बसूनच पुरस्कार स्वीकारता येणार आहे. तसेच ज्या खेळाडूंचे घर सरकारच्या साई केंद्राच्या जवळ असेल त्यांना त्या केंद्रात बोलावून गौरवण्यात येणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत ऑनलाइन या पुरस्काराचे वितरण होणार असून डीडी वाहिनीचे कॅमेरामन ही सर्व दृश्ये टिपणार आहेत तसेच दूरदर्शन वाहिनीवर कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. देशभरातील साईचे 16 केंद्रांचा या कार्यक्रमासाठी विचार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सुरू होण्याआधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्यांना ब्लेजर घालून तयार राहावे लागणार आहे. खेलरत्न पुरस्कार जिंकणाऱया खेळाडूला ब्ल्यू ब्लेझर तर अर्जुन पुरस्कार जिंकणाऱया खेळाडूला रेड ब्लेझर घालावे लागणार आहे. तसेच यावेळी त्यांच्या हातामध्ये मेडलही असणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनातून साई सेंटरशी ऑनलाइन जोडले जाणार आहेत. खेळाडूचे नाव पुकारल्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते त्या खेळाडूचे सर्टिफिवेट स्क्रीनवर दाखवण्यात येईल. त्यानंतर तो खेळाडू साईच्या हॉलमध्ये थोडय़ा अंतरावर चालत येऊन आपले मेडल दाखवेल आणि मान खाली करून राष्ट्रपतींना अभिवादन करील.  

रोहित, इशांतचा यूएईत होणार गौरव

रोहित शर्माची खेलरत्न तर इशांत शर्माची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. 29 ऑगस्टला हे दोन्ही क्रिवेटपटू आयपीएलसाठी यूएईत असणार आहेत. त्यामुळे दोघांना अबुधाबी येथील हिंदुस्थानी दूतावासात गौरवण्यात येणार आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत त्यांचे ब्लेझर त्यांना पाठवण्यात येणार आहेत.

पुरस्काराची  रक्कम वाढवली

केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांच्याकडून यंदाच्या पुरस्कार विजेत्यांच्या यादीला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला आहे तसेच खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्यांच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्तावही पुढे आला असून त्यानुसार खेलरत्न पुरस्कार विजेत्याला 25 लाख, तर अर्जुन पुरस्कार विजेत्याला 15 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यालाही 15 लाख रुपये देण्यात येणार आहेत. मात्र यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यामुळे या वर्षी किंवा पुढल्या वर्षी विजेत्यांना वाढवलेली बक्षिसाची रक्कम मिळू शकते.