
जम्मू कश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. बारामुल्ला पोलीस, 52 राष्ट्रीय रायफल आणि सीआरपीएफचे जवानांनी हाती घेतलेल्या शोध मोहिमेदरम्यान ही चकमक झाली. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली असून शोधमोहिम सुरू आहे.
बारामुल्लातील क्रीरी भागातील सलोसामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम हाती घेतली. दहशतवादी लपलेल्या परिसराला सुरक्षा दलाने घेराव घातला. सुरक्षा दलाने घेराव घातल्याचे लक्षात आल्यावर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. शेवटचे वृत्त हाती आलो तोपर्यत चकमक सुरू होती. या भागात आणखी दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू आहे.



























































