
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याचे आवाहन गणेशभक्तांना करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिका डी विभागाने ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी पालिकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. नेपीयन्सी रोड प्रियदर्शिनी पार्क येथील गणेश मूर्ती संकलन केंद्रालाही त्यांनी भेट दिली.
फिरत्या कृत्रिम तलावामुळे गर्दी न होता नागरिकांना त्यांच्याकडील गणेश मूर्तींचे शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करता येईल. तसेच गिरगाव चौपाटी किंवा इतरत्र विसर्जनासाठी गर्दी करण्याची गरज भासणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. फिरत्या कृत्रिम विसर्जन तलाव ही कल्पक संकल्पना असून यामुळे सणही उत्साहाने पण नियम पाळून साजरा करणे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.



























































