प्रलंची ‘रातराणी’ पुन्हा बहरली, ऑनलाईन साभिनय नाटय़वाचनाचा अनोखा प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे संकट बघत नाटकाचा पडदा कधी उघडेल, याबाबत काहीच निश्चित नाही. अशा स्थितीत गेल्या चार- पाच महिन्यांत काही ‘डिजिटल’ प्रयोग सुरू आहेत. साभिनय नाटय़वाचनाचा एक अनोखा प्रयोग सध्या चर्चेत आहे. दिवंगत नाटककार प्र. ल. मयेकर यांचे गाजलेले नाटक म्हणजे ‘रातराणी’! हे नाटक व्हिजन मुंबई या संस्थेचे श्रीनिवास नार्वेकर यांनी वेगळ्या रुपात रसिकांसमोर आणले आहे.

गेली अनेक वर्षे प्र. ल. मयेकर आणि त्यांच्या ‘रातराणी’ चा सुगंध नाटय़रसिकांच्या हृदयात दरवळत आहे. 1987 साली मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शनतर्फे ‘रातराणी’ नाटकाची निर्मिती करण्यात आली होती. दिग्दर्शक होते कुमार सोहोनी. उदय म्हैसकर, सतीश पुळेकर, अरुण नलावडे आणि भक्त बर्वे इनामदार यांनी नाटकात काम केले होते. गेल्या अनेक वर्षांत अनेकांनी राज्य नाटय़ स्पर्धेत ‘रातराणी’चे प्रयोगही केले. मात्र 33 वर्षांपूर्वीचा पुरुषोत्तम बेर्डे यांचा ओरिजनल म्युझिक ट्रक आणि ओरिजनल सॅली स्मिथ अरुण नलावडे यांच्यासह भारावून टाकणारा अनुभव व्हिजन मुंबईने पुन्हा रसिकांना दिला आहे. ‘व्हिजन’च्या ‘चला वाचू या’ उपक्रमाचे सहावे वर्ष आहे. अभिवाचनाच्या एक पाऊल पुढे जाऊन हा असा आगळा प्रयोग करण्यात आलाय. अरुण नलावडे, अविनाश नारकर, श्रीनिवास नार्वेकर, विनीत मराठे आणि ऐश्वर्या नारकर यांनी नाटय़वाचन केले आहे.

चला वाचू या’ हा उपक्रम दर महिन्याला असतो. यंदा उपक्रमाचे सहावे वर्ष आहे. 18 ऑगस्ट हा प्रलंचा स्मृतिदिन. त्यामुळे या महिन्याचा पुष्पाचा विचार करता ‘रातराणी’ वाचण्याचं ठरवलं. ध्यानीमनी नसताना सगळ्या सकारात्मक गोष्टी घडत गेल्या. अनेकांच्या सहकार्याने हा प्रयोग उभा राहिला. हा प्रयोग ‘पेड’ ठेवला नाही. माझ्यासहित सर्वजण प्रलंच्या प्रेमाखातर तयार झाले. ‘रातराणी’च्या साभिनय नाटय़वाचनाचा आनंद youtube.com/visionvoicenact या चॅनेलवर रसिकांना घेता येईल.
– श्रीनिवास नार्वेकर