किनाऱ्यांवर नो एण्ट्री, विसर्जन कृत्रिम तलावांतच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना रविवारी पालिकेने विभागवार तयार केलेल्या कृत्रिम तसेच फिरत्या कृत्रिम तलावांत नियमाचे पालन करीत मोठया भक्तिभावाने निरोप देण्यात आला. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, कोणतीही मिरवणूक नाही, फुलांची उधळून नाही, मात्र, बाप्पाला निरोप देताना ‘गणपतीबाप्पा मोरया’चा जयघोष आणि भक्तांचा उत्साह मात्र, ओसंडून वाहत होता. शहर व उपनगरांतील सार्वजनिक 621 तर घरगुती 30 हजार 634 असे एकूण 7 हजार 915 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यापैकी कृत्रिम तलावांत सार्वजनिक 85 व घरगुती 4 हजार 137 असे एकूण 31 हजार 200 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

गर्दी टाळण्यासाठी गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. विसर्जनावेळी गर्दी होऊ नये, यासाठी पालिकेने विभागवार कृत्रिम तलाव व फिरता कृत्रिम तलाव उपलब्ध केला आहे. अनेक मोठया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रतिसाद देत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ढोलताशांचा गजर नसला, मिरवणुका नसल्या तरी मोठय़ा उत्साहाने गणेशविसर्जन झाले.

चौपाट्या, तलावांवर पोलिसांचा वॉच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील चौपाटया तसेच तलाव मिळून 70 नैसर्गिक स्थळांवर थेट गणेशमूर्तींचे विसर्जन करायला मुंबई पालिकेने बंदी घातलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील चौपाटया आणि तलावांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी ज्या व्यक्तींनी ऑनलाईन बुकिंग केले होते त्यांच्या गणेशमूर्तींही पालिका कर्मचार्यांनी बॅरिकेट्सच्या आत ठेवलेल्या टेबलवर ठेवणे बंधनकारक केले होते. त्या टेबलांवर मूर्ती ठेवल्यावर पालिका कर्मचाऱयांच्या हस्तेच समुद्रात विसर्जन करण्यात आले, अशी माहिती ‘डी’ विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.