विदर्भातील अष्टविनायकापैकी भद्रावतीचं गणेश मंदिर पहिल्यांदाच बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात एका निसर्गरम्य टेकडीवर वसले आहे विदर्भातील अष्टविनायकापैकी एक गवराळा गणेश, अर्थात वरदविनायक. कोरोनामुळे या मंदिराच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे मंदिर कुलूपबंद असल्यानं भक्तांना यंदा वरदविनायकाचे दर्शन घेता आले नाही.

हिंदू, जैन व बौद्ध संस्कृतींचा सुरेख संगम असलेले भद्रावती शहर या गवराळा गणेश वरद विनायकासाठी विशेष प्रसिद्ध आहे. शेकडो वर्षांपूर्वीचे हे स्वयंभू गणेशस्थान विदर्भातील भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे. भद्रावती…आता कोळसा खाणी व विद्युत प्रकल्पांमुळे आघाडीला असणारे शहर. मात्र या शहराची मूळ ओळख आहे ती अत्यंत धार्मिक सद्भावाची. यात गणाधिराज गणपती बाप्पांची भूमिका विशेष आहे. भद्रावती शहराच्या एका टोकावर घनदाट राईत वसले आहे हे गणेश स्थान . या टेकडीचे नाव आहे गवराळा टेकडी. म्हणूनच गणेश स्थानालाही गवराळा गणेश अर्थात वरदविनायक असेच नाव आहे. केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर भद्रावतीच्या या गणेशाला विदर्भातील अष्टविनायकात मानाचे स्थान आहे. भद्रावतीच्या या गवराळा गणेश मंदिराच्या परिसरात आल्याबरोबर लक्ष वेधते ती इथली हिरवाई. निसर्गरम्य तलावाच्या सान्निध्यात असलेल्या या मंदिराची निर्मिती जुन्या पायऱ्यांमुळे अधिक पुरातन होते. गेल्या काही वर्षात या मंदिरात उत्तम सभागृह निर्मिले गेले आहे. मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती भव्य अशीच आहे. असे म्हणतात की, गृत्समद नावाच्या ऋषीने तपश्चर्या केल्यावर त्याला श्री गणेश प्रसन्न झाले. या ऋषीने या टेकडीवर वरदविनायकाची स्थापना केली. या आख्यायिकेला गणेश पुराणाचा आधार आहे. मन प्रसन्न करणारे व गणेशाच्या दर्शनाचा मोद देणारे हे स्थान गणेशभक्तांच्या खास आवडीचे आहे.

विदर्भातील अष्टविनायकापैकी एक असल्याने आताशा या परिसरात उत्तम विकासकामे केली जात आहेत. गणेशोत्सवातील दहा दिवसात श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्त दूरवरून इथे येतात. चतुर्थीला विशेष पूजा होते. अत्यंत जागृत अशा या गणेशस्थानाची विदर्भातील अष्टविनायकातील गणना सार्थ अशीच आहे. कोरोना संकटामुळं हे मंदिर सध्या बंद आहे.