
टोकियो ऑलिम्पिकला जवळपास एक वर्ष बाकी असतानाच बॅडिंमटन या खेळामध्ये वाद झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आल्यानंतर हैदराबादमधील पुलेला गोपीचंद या राष्ट्रीय ऑकॅडमीत टोकियो ऑलिम्पिकशी निगडित असलेल्या खेळाडूंना सरावासाठी मुभा देण्यात आली, पण स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया (साई) व बॅडिंमटन असोसिएशन ऑफ इंडिया (बाई) यांच्याकडून पारुपल्ली कश्यप याला या यादीतून वगळण्यात आले. आपल्या पतीला या कॅम्पमध्ये स्थान देण्यात आले नसल्यामुळे सात ऑगस्टपासून सुरू झालेल्या या शिबिरात सायना नेहवालने अद्याप सहभाग घेतलेला नाही.
या शिबिरात आठ खेळाडूंना परवानगी देण्यात आली आहे. मात्र सध्या या ऑकॅडमीत फक्त पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांत, साईप्रणीत व एन. सिक्की रेड्डी हेच खेळाडू सराव करीत आहेत. यामध्ये कोचिंग स्टाफमधील 10 व्यक्तींचा समावेश आहे. यावेळी सायना नेहवाल व पारुपल्ली कश्यप यांच्याकडून साई व बाईला पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्याची संधी पारुपल्ली कश्यपकडे असणार आहे हेही सांगण्यात आलेले आहे, पण पारुपल्ली कश्यपच्या समावेशाबाबत कोणतेही पाऊल अद्याप उचलण्यात आलेले नाही तसेच योग्य तो प्रतिसादही मिळालेला नाही. त्यामुळे सायना नेहवाल व पारुपल्ली कश्यप कमालीचे नाराज झालेले आहेत. सध्या दोघांचाही सराव पुलेला गोपीचंद ऑकॅडमीनजीक असलेल्या ठिकाणी सुरू आहे.




























































