
कोरोनाला यशस्वीपणे तोंड देत असताना गेल्या आठ महिन्यांत पालिकेने राबवलेल्या डास प्रतिबंधात्मक विशेष मोहिमेत आता डेंग्यू, मलेरियाची 43 हजारहून जास्त ठिकाणे नष्ट केली आहेत. त्यामुळे डासांमुळे पसरणाऱया पावसाळी आजारांचे प्रमाण कमी राखण्यात पालिकेच्या कीटकनाशक खात्याला यश आले आहे.
मुंबईत पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार पसरतात. मात्र, आधीच कोरोना असल्यामुळे कीटकनाशक विभागाने पावसाळ्या आधीपासूनच डासांच्या प्रतिबंधासाठी त्यांची ठिकाणी शोधून ती नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. मुंबईतील गृहनिर्माण संस्था ते दाटीवाटीच्या वस्त्या, झोपडपट्टय़ांमध्ये डेंग्यू, मलेरियाला कारणीभूत ठरणारी ठिकाणे नष्ट केली आहेत.
n मुंबईत पूर्व व पश्चिम उपनगर भागांच्या तुलनेत शहर भागात मलेरिया रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनाला आल्यामुळे शहर भागातील ‘ए’ विभाग ते ‘जी/उत्तर’ विभागांमध्ये म्हणजेच एकूण 9 विभागांमध्ये 6 ऑगस्टपासून विशेष मोहीम राबवली. यात एकूण 6 हजार 508 इमारती तपासण्यात आल्या. या तपासणी दरम्यान 20 हजार 772 संभाव्य ठिकाणे तपासण्यात आली. या संभाव्य ठिकाणी मलेरियाच्या डासांची 829 ठिकाणे नष्ट करण्यात आली.






























































