
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या वर्दळीच्या पर्यावरण चौकात काल संध्याकाळी 5 वर्षीय मुलीला आईच्या डोळ्यांदेखत ओढून नेत बिबट्याने डाव साधला होता. या घटनेने वीज केंद्र व्यवस्थापन आणि वनविभाग यांच्यातील वन्यजीव व्यवस्थापन आराखड्याच्या अंमलबाजावणीबाबतचा विसंवाद ठळकपणे पुढे आला आहे.
चंद्रपूर वीज केंद्र परिसरातील पर्यावरण चौक व त्याच्या आसपासच्या परिसरात घनदाट जंगल व झुडपे तयार झाली आहेत. या परिसराच्या अगदी बाजूलाच वीज केंद्र प्रशासनाची सुरक्षा सांभाळणाऱ्या सीआयएसएफ जवानांना निवासी गाळे दिले आहेत. याच गाळ्यांमध्ये राहणारी लावण्या उमाशंकर दांडेकर ही 5 वर्षाची चिमुकली आपल्या आईसोबत फिरायला जात असताना झुडपातून आलेल्या बिबट्याने मुलीला अलगद उचलून नेत जंगलात धूम ठोकली. आईने आरडाओरडा करत गर्दी एकत्र झाल्यावर शोध घेतल्यानंतर जखमी अवस्थेतील चिमुकली आढळून आली. लावण्या हिला तातडीने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र यादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर 1100 हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वन्यजीवांच्या घातक वास्तव्याबाबत दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
वीज केंद्राच्या विस्तीर्ण परिसरात शेकडो एकर जंगल असून, त्यात पाणवठे व वाघवर्गीय प्राण्यांच्या खाद्याचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. अशा स्थितीत वाघ -बिबटे -अस्वल- रानडुक्कर यासह विविध वन्यजीव महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात फिरत असतात. वारंवार या वन्यजीवांचा नागरिकांसोबत संघर्ष होत असतो. मात्र तरीही या वन्यजीवांच्या व्यवस्थापनाबाबत वीज केंद्रानं ठरवून दिलेल्या आराखड्याप्रमाणे कुठलीही उपाययोजना केलेली नाही. याबाबत कित्येकदा वरिष्ठ स्तरावर बैठका झाल्या. मात्र, या बैठकांमध्ये कालबद्ध कार्यक्रम आखूनही कुठल्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. परिणामी मानव-वन्यजीव संघर्ष चिघळत गेला व त्याची परिणती चिमुरडीच्या मृत्यूत झाली. दरम्यान, सध्या या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागानं पिंजरे लावून कॅमेऱ्याद्वारे त्याची हालचाल टिपण्याचा प्रयत्न चालवला आहे. आगामी काळात कॅमेरे व पिंजरे यांची संख्याही वाढवली जाणार असून, लावण्याच्या मृत्यूनंतर वीज केंद्र प्रशासनाचा गलथान कारभार प्रकर्षानं पुढे आला आहे.

























































