न्यायालयाचा अवमान, मल्ल्याच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरलेला कुख्यात मद्य उद्योजक विजय मल्ल्याच्या याचिकेवरील निर्णय गुरुवारी सर्वाेच्च न्यायालयाने राखून ठेवला. मल्ल्याने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून मुलांच्या खात्यात जवळपास 280 कोटी रुपये ट्रान्स्फर केले होते. याप्रकरणात मे 2017 मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. त्या निकालाविरोधात मल्ल्याने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

न्यायमूर्ती यू. यू. ललित आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने गुरुवारी मल्ल्याच्या याचिकेवर दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून घेतले व त्यानंतर अंतिम निर्णय राखून ठेवला. मल्ल्याने न्यायालयीन आदेश धाब्यावर बसवत मुलांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केले. त्याचबरोबर त्याने संपत्तीचा तपशील जाहीर करताना लपवाछपवी केली, असा आरोप आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसंबंधी एक कागदपत्र फाईलमधून गायब झाले होते. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली होती. मल्ल्याने विविध बँकांचे तब्बल 9 हजार कोटींहून अधिक रुपये बुडवल्याचा आरोप आहे.