
जम्मू-कश्मीर खोऱयातील दहशतवादी गटांचे कंबरडे मोडण्याचा निर्धार हिंदुस्थानी लष्कराने केला आहे. सुरक्षा बलांचा दहशतवादी टोळ्यांवरील जबर घणाघात सुरूच आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी पहाटे पुलवामाच्या जादुरा भागातील चकमकीत लष्कराने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मात्र या कारवाईत 1 हिंदुस्थानी जवानाला हौतात्म्य पत्करावे लागले आहे.या चकमकीनंतर सुरक्षा बलांनी मोठय़ा प्रमाणावर दारुगोळा आणि शस्त्रे जप्त केली आहेत.
शुक्रवारी दुपारीच हिंदुस्थानी सुरक्षा बलांनी शोपीयानच्या किलूरा भागात दहशतवाद्यांवर झडप टाकत 4 कडव्या दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. आज भल्या पहाटे पुलवामाच्या जादूरा भागात दहशतवादी लपल्याची खबर मिळताच सुरक्षा बलांनी तेथे धाव घेतली. मोठय़ा शस्त्रसाठय़ासह जादूरात लपलेल्या दहशतवाद्यांनी हिंदुस्थानी जवानांवर जोरदार हल्ला चढवला. लष्करी जवानांनीही त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देत जेरीला आणले. या जोरदार चकमकीत 3 अज्ञात दहशतवादी ठार झाले, तर एक लपलेल्या दहशतवाद्याचा कसून शोध घेतला जात आहे.
गेल्या दोन आठवडय़ात हिंदुस्थानी लष्कराने लश्कर ए तोयबाच्या दोन टॉप कॅमांडर्ससह 10 दहशतवाद्यांना ठार केले आहे. बारामुल्लाच्या करीरी येथील चकमकीत तर बंदीपोरा भागात हत्याकांड घडवणारा कमांडर सज्जाद उर्फ हैदर आणि भाजप नेते कसीम बारी व त्यांच्या वडिलांसह भाकाची हत्या करणारा विदेशी दहशतवादी उस्मानला सुरक्षा बलांनी कंठस्नान घातले आहे. 28 ऑगस्टला शोपीयानमध्ये लष्कराने 4 कडव्या दहशतवाद्यांचा खात्मा करून लश्कर आणि अन्य दहशतवादी संघटनांना मोठा झटका दिला होता.
अटक दहशतवाद्याच्या माहितीवरून लष्कराचे धाडसत्र
शुक्रवारी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला लष्कराने अटक केली होती. या जेरबंद दहशतवाद्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सुरक्षा बलांनी पुलवामाच्या जादूरात जोरदार धाड टाकली. हिंदुस्थानी लष्कराचा सुगावा लागताच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांकर जोरदार गोळीबार केला. हिंदुस्थानी जवानांनीही या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत 3 अज्ञात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले. चकमकीनंतर सुरक्षा बलांनी मोठय़ा प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जादूरातून जप्त केला. या झटापटीनंतर लपलेल्या अन्य एका दहशतवाद्याचा कसून शोध घेतला जात असल्याचे लष्कराने स्पष्ट केले.



























































