
बोगस बियाणे प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी शनिवारी शासन नियमांचे उल्लंघन करुन आंदोलन केल्या प्रकरणी भाजपाचे माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह 28 जणांवर शहरातील कोतवाली व नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकर्यांना बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीने शनिवारी महाबीजच्या कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली होती. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 29 ऑगस्ट रोजी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर, राहुल लोणीकर, माजी आमदार विजय गव्हाणे, माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, प्रमोद वाकोडकर, गणेश रोकडे, गोपीराज शिंदे, बाळासाहेब जाधव, शिवाजी दिवटे, अनंता कन्हाळे, आकाश लोहट, डी.एस. कदम, सुरेश भूमरे, शिवाजी बोचरे पाटील, चंद्रकांत डहाळे, राहुल संघई आदी 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संचारबंदीचे उल्लंघन, आपत्ती व्यवस्थापन कायदा आदी कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच अनुषंगाने नवा मोंढा पोलीस ठाण्यातही शनिवारी सायंकाळी 7.20 वाजेच्या समारास माजीमंत्री आमदार लोणीकर यांच्यासह 17 ते 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































