महाराष्ट्रातील प्रवासासाठी रेल्वेने उघडली तिकीट खिडकी, सुमारे 30 गाडय़ांचा प्रवाशांना फायदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱया जिल्ह्यात जाण्यासाठी असलेली ई-पासची अट रद्द करण्यात आल्यानंतर रेल्वेनेही राज्यातल्या राज्यात प्रवासास मंजुरी दिली आहे. मध्य रेल्वेने राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करतानाच 2 सप्टेंबरपासून रेल्वेचे बुकिंगही सुरू केले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या 230 मेल-एक्स्प्रेसपैकी मुंबईतून सुटणाऱया सुमारे 30 गाडय़ांना राज्यातील स्थानकांवर थांबा मिळणार आहे.

महाराष्ट्र सरकारने राज्यात ‘अनलॉक-4’ जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात आंतर जिल्हा प्रवासासाठी असलेली ई-पासची अट रद्द केली आहे. त्याला अनुसरून मध्य रेल्वेने आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करीत असल्याचे काल जाहीर करीत बुधवारपासून रेल्वेच्या तिकिटांचे बुकिंगही सुरू केले आहे. याचा फार मोठा दिलासा प्रवाशांना मिळणार आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर, सोलापूर, संभाजीनगर, लातूर, गडचिरोली येथे जाता येणार आहे तसेच या भागातून मुंबईत येता येणार आहे.

जेईई व नीटसाठी ‘परे’च्या 46 अतिरिक्त फेऱया

1 ते 6 सप्टेंबपर्यंत ‘जेईई’ची परीक्षा देणाऱया व 13 सप्टेंबरला होणाऱया ‘नीट’ परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत पश्चिम रेल्वे 46 अतिरिक्त फेऱया सोडणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रत्येकी 350 फेऱया सध्या चालवत आहे. पश्चिम रेल्वेच्या 46 फेऱया अतिरिक्त असणार आहेत.