कोरोनाच्या संकटातही वाड्या-वस्त्यांवर शिक्षणाची गंगा प्रवाही; झाडाखाली, अंगणात अध्ययन केंद्र सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण, अतिदुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणाचे सुरुवातीला आव्हान होते. मात्र, नाशिक जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षकांनी नवनवे प्रयोग राबवत मार्ग काढला. लासलगाव व पाचोरे बुद्रुक केंद्रामधील नऊ ते दहा शाळेतील शिक्षकांनी शक्य तेथे ऑनलाईन वर्ग 7 जुलैपासूनच सुरू केले असून, उर्वरित मुलांसाठी वाड्या-वस्त्यांवर कुठे अंगणात, ओट्यावर, तर कुठे झाडाखाली शाळा भरवण्यास सुरुवात केली आहे. दोन महिन्यांपासून या ऑफलाईन शाळेत त्या-त्या वस्तीवरील पहिली ते सातवीची मुले शिक्षकांकडून धडे घेत आहेत. मुलांनीही हा बदल सहज अंगीकारला असून, ते आता पहिल्या चाचणी परीक्षेसाठी उत्सूक आहेत.

निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीचे 240 विद्यार्थी आहेत. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे मार्चपासून शाळा बंद झाल्या. तेव्हा येथील नऊ शिक्षकांनी किती मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन आहे याची माहिती काढली. शासनाच्या आदेशाची वाट न बघता प्रथम शिक्षक आणि पालकांना ‘झूम’वरून प्रशिक्षण दिले. त्यानंतर 7 जुलैपासून ‘गुगल मीट’वर रोज 140 मुलांना शिक्षण दिले जात आहे. या ऑनलाईन वर्गांना दररोज 70 ते 80 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असते. या पद्धतीने इतरही भागात मुलांना शिक्षण मिळावे म्हणून शिक्षक गजानन उदार यांनी 175 शिक्षकांना दोन दिवसाचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले.

शाळेतील उर्वरित स्मार्टफोन नसलेल्या मुलांच्या शिक्षणाचे काय, हा प्रश्न होताच. गजानन उदार, पृथ्वीराज भदाणे, परशुराम ठाकरे या शिक्षकांनी आपले ऑनलाईन वर्ग आटोपल्यानंतर रोज चंदनवाडी, वाणी वस्ती आणि शाळा आवारात अध्ययन केंद्र सुरू केले. दररोज हे तिघे झाडाखाली, अंगणात असे वर्ग घेतात. त्यात 15 ते 20 मुलांची हजेरी असते. या केंद्रात इयत्तेचे बंधन नाही. परिसरातील पहिली ते सातवीची मुले सोशल डिस्टन्सिंग आणि सर्व नियम पाळून हजेरी लावतात, एकाचवेळी त्यांना त्यांच्या वर्गाप्रमाणे शिक्षक शिकवत आहेत. टाकळी विंचूर प्रमाणेच पाचोरे बुद्रुक व लासलगाव केंद्रातील कोटमगाव, शिवापूर, लासलगाव स्टेशन, येळापूर, पाचोरे खुर्द, पाचोरे बुद्रुक येथे अशी अध्ययन केंद्रे सुरू आहेत.

कॉन्फरन्स कॉलवरही शिक्षण

ज्या मुलांच्या पालकांकडे केवळ साधा फोन आहे, त्या मुलांसाठी कॉन्फरन्स कॉलद्वारे मार्गदर्शन करण्याचा मार्ग काही शिक्षकांनी उपयोगात आणला आहे. साधारण 15 ते 20 मिनिटे फोनवरून शिकवण्यात येत आहे.