
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमधील कोरोनाचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी मुंबईतील धारावी व वरळी कोळीवाडा पॅटर्न राबवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहे.
नागपूरमध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. उपराजधानीत सध्या कोरोना रुग्णांची संख्या 35 हजारांच्या आसपास आहे. मृत्यु दरातही वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्लाबसिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांची टीम सोबत घेऊन अनिल देशमुख नागपूरात दाखल झाले. या टीमध्ये प्रख्यात डाँ. ओम श्रीवास्तव, डाँ. राहुल पंडित, डाँ. लकडावाला व डॉ. गौरव चतुर्वेदी यांचा समावेश आहे. मुंबईतील कोरोनाचा हाँटस्पाँट म्हणून ओळखल्या गेलेल्या धारावी व वरळी कोळीवाडय़ातील कोरोनावर महापालिकेने शिस्तबध्द पध्दतीने नियोजन करून नियंत्रण मिळवले. त्या अनुभवाचा फायदा नागपूरमधील डॉक्टरांना करून देण्यात येणार आहे.
या संदर्भात प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, नागपूरमधील कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासाठी मुंबईतील तज्ञ डाँक्टरांची टीम नागपूरमध्ये आली आहे. या तज्ञांनी स्थानिक डाँक्टरांशी चर्चा केली आहे. या तज्ञांच्या सुचनांची अंमलबजावणी नागपूरमध्ये केली जाईल.





























































