
पुणे शहरातील हडपसर परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 6 कोयते, कटावणी, मिरची पावडर, दुचाकी असा एकूण 81 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी मध्यरात्रीनंतर 1.30 वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील पॅराग्लायडिंग मैदानालगत करण्यात आली.
फैय्याज गफ्फार बागवान (वय 24), फैय्याज इस्माईल बागवान (वय 24), सिद्धार्थ उर्फ सिद्धु हनुमंत कट्टिमनी (वय 19), इम्रान मुस्ताक पठाण (वय 21) , नागेश रामा कांबळे (वय 21), आफताब हकिम बागवान ( सर्व रा. हडपसर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गोविंद चिवळे यांनी तक्रार दिली आहे. हडपसर पोलिस पेट्रोलिंग करीत असताना, पॅराग्लायडिंग परिसरात संशयास्पद तरुण थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 6 कोयते, कटावणी, मोबाईल, मिरची पावडर, दुचाकी असा ऐवज सापडला. परिसरातील एटीएम मशीनवर दरोडा टाकण्याच्या तयारीत ते असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड अधिक तपास करीत आहेत.























































