
आदिवासी शाळांमधील मुलांना आता पोषण अहारांतर्गत दुधाची पावडर मिळणार आहे. शेतकऱ्य़ांकडे अतिरिक्त ठरणाऱ्य़ा दुधाची राज्य सरकार खरेदी करत असून त्यापासून दुधाची पावडर बनवत आहे. आतापर्यंत जवळपास साडेचार लाख मेट्रिक टन पावडर तयार झाली आहे. ती मार्गी लावण्यासाठी आदिवासी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्य़ा विद्यार्थ्यांना प्रति दिवसासाठी 18 ग्रॅम पावडर देण्यात येणार आहे. याचा लाभ जवळपास 6 लाख 51 हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. या दूध पावडरीच्या पॅकिंग आणि वितरणाची जबाबदारी महानंद डेअरीवर असणार आहे.
राज्य सरकारने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत 6 लाख 51 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना दूध पावडर देण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांबरोबर 1 लाख 21 हजार गरोदर महिला आणि स्तनदा मातांना प्रतिदिन 25 ग्रॅमप्रमाणे प्रत्येक महिन्याला 750 ग्रॅम पावडर दिली जाणार आहे.
























































