रेल्वेत भीक मागणे, सिगारेट ओढणे आता गंभीर गुन्हा नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेत भीक मागणे, चेन पुलींग करणे किंवा सिगारेट्स ओढणे यासारखे गुन्हे आता गंभीर स्वरूपाचे गुन्हे राहणार नाहीत. कारण केंद्र सरकारने अशा स्वरूपाच्या छोट्या गुन्ह्यांचे निर्गुन्हेगारीकरण करण्याचा प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांना किरकोळ गुन्ह्यांच्या यादीत समाविष्ट केले जाणार असल्याने अशा गुन्ह्यांत तुरुंगवासाची शिक्षा न देता जागेवरच दंडात्मक कारवाई करून आरोपींना सोडण्यात येणार आहे.

कायदा व सुव्यवस्था आणि न्याय यंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने किरकोळ गुन्ह्यांचे निर्गुन्हेगारीकरण (डिक्रिमिलायझेशन ऑफ मायनर ऑफन्स) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात सध्या अस्तित्वात असलेल्या 19 कायद्यांतील तुरुंगवासाच्या शिक्षा असलेल्या कलमांची यादी सादर केली आहे. जागच्या जागी दंड वसुलीसाठी एखादे मोबाईल ऍप सुरू करता येईल काय याचीही चाचपणी सुरू असल्याचे मध्य रेल्वे रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के.के.अश्रफ यांनी सांगितले.

या गुन्ह्यांत तुरुंगवास टळणार

विनातिकीट प्रवास करणे (कलम 137), सुरक्षा साखळी खेचणे (कलम 141), बेकायदेशीरपण वस्तू विक्री (कलम 144), उपद्रव करणे (कलम 145), रूळ ओलांडणे (कलम 147), तिकीटात फेरफार करणे (कलम 157), महिलांच्या डब्यातून प्रवास (कलम 162), कचरा करणे (कलम 166), सिगारेट ओढणे (कलम 167) अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे निर्गुन्हेगारीकरण करण्याचा प्रस्ताव आहे.       

चेन पुलिंग केल्याने 45,784 जण अटकेत

रेल्वे सुरक्षा बलाच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये सुरक्षा साखळी खेचण्याच्या 55,373 घटना घडल्या असून त्यात 45,784 जणांना अटक होऊन 43,951 जणांवर खटला चालविण्यात आला. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार 2018 मध्ये आरपीएफ रेल्वे हद्दीत 10,94,684 केसेस दाखल केल्या. तर जीआरपीने याच काळात 1,01,638 गुन्हे दाखल केले होते.