सरकारी कंपन्या विकण्याची नरेंद्र मोदी यांची मोहीम; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेते राहुल गांधी सरकारी धोरणांवर सातत्याने टीका करत आहेत. सरकारची आर्थिक धोरणे, कोरोनाचे संकट, वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी आक्रमकपणे सरकारवर हल्ला चढवला आहे. सरकारी कंपन्याच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून सोमवारीही राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला होता. खासगीकरणामुळे फक्त नरेंद्र मोदी यांच्या काही मित्रांचा फायदा होणार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता एलआयसीची भागीदारी विकण्याच्या सरकारच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली आहे. सरकारी कंपन्या विकण्याची मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी चालवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

सरकारी विमा कंपनी एलआयसीची भागीदारी सरकारी विकणार असल्याचे वृत्तावर राहुल गांधी ट्विटरवरून सरकारवर हल्ला चढवला आहे. मोदी यांनी सरकारी कंपन्या विकण्याची मोहीम सुरू केली आहे, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेल्या संकटांचा देश मुकाबला करत आहे. सरकारच्या अयोग्य धोरणांमुळे अर्थव्यवस्था ढासळली आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारनेच निर्माण केलेल्या या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी देशाची संपत्ती विकण्यात येत आहे. सरकारी कंपन्या विकणे ही लाजिरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले. जनतेची सुरक्षा वाऱ्यावर सोडत एलआयसीसारखी सरकारी विमा कंपनी विकणे शरमेचे असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

एलआयसीचे 25 टक्के शेअर विकण्याची केंद्र सरकारची योजना आहे. या कंपनीचे लवकरच आयपीओ येणार आहेत. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाला काँग्रेसने विरोध केला आहे. अशा प्रकारचे खासगीकरण अनावश्यक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. राहुल गांधी यांनीही खासगीकरणाविरोधात आक्रमक भूमिका घेत ट्विटरवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली आहे.