
वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढळलेल्या संबंधितांवर नियमान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणासंदर्भात कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. त्यांच्या निवेदनास उत्तर देताना गृहमंत्री बोलत होते. यावेळी सदस्य सुनिल प्रभू, ऊर्जामंत्री डॉ.नितिन राऊत यांनीही गुन्हेगारास तत्काळ अटक करण्याची मागणी केली.
अन्वय नाईक यांनी त्यांची आई कुमुद नाईक यांच्यासह 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील राहात्या घरी आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासह तीन जणांची नावे होती. स्टुडियोचे काम करूनही 83 लाख रुपये गोस्वामी यांनी न दिल्याने नाईक यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला आणि तणावग्रस्त होऊन आत्महत्या करत असल्याचे नाईक यांनी सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे म्हटले. त्यानुसार अर्णब गोस्वामीविरूद्ध गुन्हा दाखल झाला.
पुण्यातील प्रख्यात बिल्डर सुरेश परमार यांच्या आत्महत्या प्रकरणी सुसाईड नोट पुरावा म्हणून ग्राह्य धरून आरोपींना अटक केली होती. मग अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्यांनाही अटक करा अशी मागणी सरनाईक यांनी केली होती. आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पत्र लिहून अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपशील आणि त्या तपासात झालेल्या दिरंगाईचा लेखाजोखा मांडला होता.
अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी एक व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर केला होता.या व्हिडीओमध्ये त्यांनी माझ्या सासू आणि नवऱ्याच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामी जबाबदार आहेत, तत्कालीन सरकारने आमचे केस दाबून टाकली. मला न्याय मिळाला नाही, अर्णब गोस्वामी माझ्या कुटुंबाचा गुन्हेगार आहे त्याला अटक करा असे म्हटले होते.



























































