
शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बागायती क्षेत्र असलेल्या कवठे येमाई गावात मुंजाळवाडीत मागील आठवड्यापासून बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्या शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांना फस्त करत असल्याने शेतावर वस्ती करणारे नागरिक, शेतकरी धास्तावले आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुंजाळवाडी येथील भगवान शंकर हिलाळ यांच्या घोडीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले.
मागील दोन तीन महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून दिवसाही बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना झाले आहे. या परिसरात मानवी वस्ती असल्याने बिबट्याची दहशत पहाता वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.हेमंत पवार व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. तर बिबट्याची दहशत पाहता परिसरातील नागरिक चांगलेच घाबरले असून वारंवार पाळीव प्राण्यांवर होत असलेले हल्ले पाहता या बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यासाठी वन विभागाने या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.
वनविभागास घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. नागरिकांची या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. या परिसरात लवकरच पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनपाल चारुशीला काटे व हनुमंत कारकूड यांनी सांगितले. शेतावर वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांनी बिबटयांपासून बचावासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन शिरूर वन विभागाने केले आहे.



























































