
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयावर स्थगिती दिल्याने आज गुरूवारी जाहीर होणारी अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी लांबणीवर गेली आहे. शिक्षण संचालनालयाकडून प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर होईपर्यंत प्रवेशप्रक्रिया रखडणारच असून याचा फटका विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला बसणार आहे. या विलंबामुळे अकरावीचे प्रथम सत्र वाया जाण्याच्या मार्गावर आहे.
आधीच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीचा निकाल उशीराने जाहीर झाला त्यामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेशही लांबणीवर गेले. त्यात आता मराठा आरक्षणावर आलेल्या न्यायालयाच्या स्थगितीची भर पडली आहे. मराठा आरक्षण वगळून यापुढील अकरावी प्रवेश प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. दरवर्षी या काळात 50 टक्के प्रवेश पूर्ण झालेल्या कॉलेजमध्ये अकरावीचे वर्ग सुरू होतात पण यंदा प्रवेशप्रक्रियाच खोळंबली आहे. आतापर्यंत अकरावीची एकच गुणवत्ता यादी जाहीर झाली असून आणखी दोन गुणवत्ता याद्या तसेच विशेष फेरीतील प्रवेश होणे बाकी आहे. हे प्रवेश पूर्ण होण्यास आणखी एक महिन्याचा काळ लागणार आहे. अकरावीचे ऑनलाईन वर्गही प्रथम सत्र संपता संपता म्हणजे दिवाळी सुट्टीपूर्वी सुरू होतील अशी चिन्हे आहेत.
आतापर्यंत शाखानिहाय प्रवेश
आट्र्स – 8892
कॉमर्स – 41130
सायन्स – 27724
एच.एस.व्ही.सी – 864
एकूण – 78610
आतापर्यंत झालेल्या प्रवेशावर परिणाम नाही
अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेबाबत राज्य सरकारकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आतापर्यंत जे अकरावी प्रवेश झाले आहेत त्यावर परिणाम होणार नाही. – विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त.
प्रथम सत्र डिसेंबरपर्यंत सुरू ठेवा
अकारावी प्रवेशाला होणारा उशीर पाहता अकरावीचे शैक्षणिक वर्ष ऑक्टोबर ते एप्रिल असे राबविण्यात यावे अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे सरचिटणीस प्रा. मुकुंद आंधळकर यांनी केली आहे. अकरावीचे प्रथम सञ डिसेंबरपर्यंत घेण्यात यावे तसेच अभ्यासक्रमाची व्याप्ती कमी करून परीक्षाही वैकल्पिक स्वरूपात घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.






















































