Out door व्यायाम करताना अशी काळजी घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय गायकवाड (मॅरेथॉन प्रशिक्षक)

आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी मोकळय़ा हवेत व्यायाम करण्याची परवानगी दिली आहे. अर्थात फिटनेसच्या आणि पर्यायाने स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले तरच हा व्यायाम सर्वार्थाने आरोग्यपूर्ण होईल.

जेव्हा तुम्ही चालण्यासाठी घराबाहेर पडाल तेव्हा एकमेकांसाठी खूप दूर राहा. गटागटाने चालणे, धावणे, योगासनं असे व्यायामप्रकार करू नयेत. एकमेकांशी बोलतही व्यायाम करू नये. वॉक केल्यानंतर एकमेकांशी गप्पा वगैरे असे प्रकार करू नये. कारण ज्यांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास आहे. अशा लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग पटकन होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही कारणाकरिता बाहेर गेल्यास कोणाच्याही संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. व्यायामाचे सर्व साहित्य स्वतःचेच असावे.

आऊटडोअर व्यायामात धावणे, सायकल चालवणे, चालणे, ट्रेक करणे हे  चार व्यायाम प्रकार करता येतात. या चारही व्यायाम प्रकारांसाठी मास्क वापरला तर त्रास होऊ शकतो. आऊट डोअर व्यायाम केला तरी कोणत्याही प्रकारच्या ग्रुप ऑक्टिव्हिटीच्या संपर्कात आपण येणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रुप ऑक्टिव्हिटी आपण केली तर दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी 5 मीटरचे अंतर राहील हे पाहावे.घराबाहेर पडण्याआधी स्वतःचा टॉवेल, योगामॅट, पाण्याची बाटली, सॅनिटायझर , मास्क या सर्व वस्तू बॅगेत ठेवा.

आजी-आजोबांसाठी महत्वाचे

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम केल्यानंतर कोणीही एकमेकांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. याचे कारण असे की, जेव्हा आपण कुठालाही व्यायाम प्रकार केल्यानंतर आपली रोगप्रतिकारशक्ती काही काळासाठी कमी झालेली असते. त्यावेळी कुठलाही संसर्गजन्य आजार लवकरच होऊ शकतो. त्यामुळे कोणाच्याही संपर्कात न येता दूर कसे राहू याची काळजी घ्यावी.

  • जीवनसत्त्व सी आणि ई मिळेल असा आहार घ्यावा. लिंब, संत्रं, आवळा यांचे सरबत करून प्यावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होईल.
  • व्यायाम केल्यानंतर पौष्टिक न्याहारी करावी. यामध्ये ब्रोकली, पनीर, उकडलेले अंडे खाऊ शकता. नाचणी सत्त्व घेऊ शकता.
  • रात्री वेगवेगळ्या प्रकारची कडधान्यं भिजवायची आणि ती सकाळी हलकीशी तेलावर परतवून नाश्त्यावेळी खाऊ शकता.
  • दूध दिवसभरात अर्धा लिटर घेऊ शकता. रात्री झोपताना कपभर दुधात हळद आणि एक चमचा तूप घालून प्यावे. यामुळे आजारांपासून दूर राहायला मदत होईल.

दुपारचं आणि रात्री जेवण यासाठी ठरावीक वेळ ठरवा. दुपारचं जेवण साडेबारा ते एक दरम्यान आणि रात्रीचं जेवण 9च्या आत व्हायला हवे. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. रात्री शक्यतो हलका आहार घ्यावा. रात्री भाकरी, पालेभाजी, रस्साभाजी, सडीच्या तांदळाची खिचडी घ्यावी.

आवश्यकता असेल तरच….

शक्यतो आऊटडोअर व्यायाम करण्याची खूपच गरज असेल तरच व्यायामाकरिता घराबाहेर पडावं. नाहीतर घरी राहूनही चालणे, योगासनं, प्राणायाम हे व्यायाम प्रकार करता येऊ शकतात. कुटुंब, मित्र यांच्याबरोबर फिरायला, व्यायामाकरिता एकत्र घराबाहेर पडू नये. यामुळेही संसर्ग होऊ शकतो. व्यायामाव्यतिरिक्त वेळेत मास्क वापरावाच. सायकलिंग करताना ग्लोव्हज वापरू शकता. इतर व्यायाम प्रकार केल्यानंतर सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवावेत. कोरोनामुळे आरोग्यदृष्टय़ा स्वच्छ कसं राहावं ही मोलाची शिकवण आपल्याला मिळाली आहे.

आऊटडोअर व्यायाम करणे शक्य नसल्यास …

  • स्पॉट वॉक म्हणजे जागेवर चालणे, सूर्यनमस्कार, वेगवेगळ्या प्रकारचे बॉडीवेट ट्रेनिंग जे यूटय़ुबवर पाहायला मिळतील.
  • वाहिन्यांवर जिम ट्रेनर किंवा कोच लोकांना व्यायामाचं ट्रेनिंग देत आहेत.
  • घरी राहूनही व्यायामाचं ग्रुप ट्रेनिंग ऑनलाइन घेऊ शकता.

 आऊटडोअर व्यायाम कोणासाठी?

दोन प्रकार फिटनेसमध्ये मोडतात. एक म्हणजे प्रोफेशनल कॅटॅगरी आणि रिक्रिएशन कॅटॅगरी. प्रोफेशनल लोकांना घराबाहेर पडून व्यायाम करणे गरजेचे असते. जर त्यांनी असे केले नाही तर त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी तयारी करणे जड जाऊ शकते. सायकलिंग करणारे, ऍथलिट यांना मैदानात येऊनच तयारी करायला हवी. यांनीही  कोरोना काळात एकएकटय़ानेच व्यायाम करून स्वतःचा परफॉर्मन्स लेवल मेंटेन ठेवणं गरजेचं आहे.  रिक्रिएशनल प्रकारात असे लोक येतात ज्यांना फक्त स्वतःला फिट ठेवायचं आहे. त्यांना घरात राहुनही रोज व्यायाम करता येतो.