
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयासह आवाजाचीही छाप पाडली आहे. त्यांच्या आवाजाची भुरळ आता अनेकांच्या घरात असलेल्या ऍलेक्सालादेखील पडली आहे. नुकतीच अमेझॉन कंपनीने बिग बी यांच्याशी भागीदारी केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ऍलेक्सा बिग बी यांच्या आवाजात गप्पा मारताना दिसणार आहे.
ऍलेक्सा ही अमेझॉनची व्हॉईस असिस्टंट सर्व्हिस आहे. हिंदुस्थानातदेखील ही सर्व्हिस लोकप्रिय होत आहे. ऍलेक्साला बिग बी यांचा आवाज दिल्याने हिंदुस्थानात त्याची लोकप्रियता आणखी वाढेल यात शंका नाही. ऍलेक्सासाठी स्वत:चा आवाज देणारे बिग बी पहिले हिंदुस्थानी ठरले आहेत. 2021 पासून या सर्व्हिसला सुरुवात होणार असून युजर्सकडून ठराविक शुल्क आकारले जाईल. त्यासाठी ऍलेक्साला ऑन केल्यानंतर ‘ऍलेक्सा, से हॅलो टू मि. अमिताभ बच्चन’ असे म्हणावे लागेल. ‘या माध्यमातून मी व्हॉईस टेक्नॉलॉजीने चाहत्यांशी जोडला जाईन’, असे बिग बी म्हणाले.



























































