
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) बंडाळी माजण्यास सुरुवात झाली आहे .लोकजनशक्ती पार्टीचे (लोजपा) चिराग पासवान यांनी संयुक्त जनता दलाचे (जदयू) सर्वेसर्वा, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. यामुळे नितीशकुमार यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
बिहारमध्ये जदयू,भाजप आणि लोजपा यांची आघाडी आहे. विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. मात्र पूरपरिस्तिथी, कोरोना हाताळण्यात नितीशकुमार यांना अपयश आले आहे. जनतेत त्यांची लोकप्रियता कमी झाल्यामुळे नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवू नये. अन्यथा आम्ही बाहेर पडू असा इशारा लोजपाने दिला होता. आता पुन्हा चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे.
पंतप्रधान मोदींना पत्र, नड्डा यांची भेट
पासवान यांनी मंगळवारी रात्री भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. निवडणुकीत जेडीयूपेक्षा जास्त जागा भाजपने काढाव्यात. अन्यथा निवडणुकीत फटका बसेल असे पासवान यांनी नड्डा यांना सांगितल्याचे वृत्त आहे. याच मुद्यावर पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पत्र पाठविले आहे






















































