
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेतील अंपायरच्या निर्णयामुळे अनेकदा वाद झाला आहे. यूएईमध्ये सुरू असलेल्या 13 व्या हंगामात देखील हेच सुरू असून याचा फटका खेळाडू आणि संघाला बसत आहे. विशेष म्हणजे फक्त मैदानावरील पंचच नाही तर तिसरे पंचही चुकामुका करत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान असतानाही तिसरे पंच चुका करत असल्याने सवाल उपस्थित होत आहेत. असेच काहीसे शनिवारी आयपीएलमधील 15 व्या लढतीत पाहायला मिळाले.
अबू धाबी मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सचा संघ आमनेसामने आला. या लढतीत राजस्थानच्या संजू सॅमसन याला तिसऱ्या पंचांनी चुकीच्या पद्धत बाद दिल्याने वाद निर्माण झाला आहे. दमदार फॉर्मात असलेल्या संजूला बंगळुरू विरुद्ध 4 धावांवर असताना वादग्रस्त पद्धतीने झेलबाद देण्यात आले.
बंगळुरू विरुद्ध खेळताना संजू सॅमसन याने चहलच्या गोलंदाजीवर समोरच्या बाजूला फटका मारला. मात्र चहलने हवेत सूर मारत झेल घेतला. बंगळुरूचे खेळाडू विकेटचा आनंद साजरा करत असताना मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेण्याचे ठरवले. रिपीट टेलिकास्टमध्ये झेल घेण्याआधी चेंडू जमिनीला घासल्याचे स्पष्ट दिसत असतानाही तिसऱ्या पंचांनी संजूला बाद दिले.































































