वन्यजीवांचा हक्क मान्य करूया!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजीव मुळ्ये,  [email protected]

वन्यजीवांच्या संवर्धनाविषयी जाणीवजागृती करणारा सप्ताह सुरू झाला आहे. वास्तविक आपण कुणाचे तरी संरक्षण, संवर्धन करतो ही मानसिकतासुद्धा वर्चस्व, श्रेष्ठत्व दर्शविणारी आहे. या पृथ्वीवर जेवढे जीवजंतू आहेत त्यांचा पृथ्वीवर आपल्याइतकाच हक्क आहे. आपण हे विसरल्यामुळेच आज ठिकठिकाणी मानव-वन्यजीव संघर्ष पाहायला मिळतो. वन्यजीवांच्या आणि वनस्पतींच्या प्रजाती वेगाने नष्ट होण्यात आपलाच ऱ्हास आहे हे वास्तव वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आपण स्वीकारायला हवे.

1 ते 7 ऑक्टोबर या काळात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. आपल्या देशात तो 1952 पासूनच साजरा केला जातो. वन्यजीवांशी असलेल्या आपल्या नात्याची जाणीव ठेवणे आणि त्यांचे संरक्षण, संवर्धन करण्याच्या दृष्टीने समाजात जागरूकता निर्माण करणे हा या सप्ताहाचा उद्देश. वस्तुतः आपण कुणाचे संवर्धन किंवा संरक्षण करीत आहोत ही मानसिकतासुद्धा आपले वर्चस्व, श्रेष्ठत्व दर्शविणारी आहे. या पृथ्वीवर छोटय़ात छोटय़ा जीवजंतूंपासून अक्राळविक्राळ जंगली प्राण्यांपर्यंत जे जीव निर्माण झाले त्यांचा या धरतीवर आपल्याइतकाच हक्क आहे. वन्यजीव मानवी वस्तीत शिरतात आणि मानव-वन्यजीव संघर्ष उभा राहतो तेव्हा ‘कोण कुणाच्या घरात शिरले आहे?’ हा प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही. आपल्या दृष्टीने आपला म्हणजे मानवजातीचा विकासच सर्वांत महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी मानवेतर पशुपक्षी, त्यांचे अधिवास, त्यांचे अन्नपाणी याचे मोल द्यावेच लागणार असे विचार आपल्या मनात सुप्तपणे वावरत असतात. मानवाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक जमीन लागते आणि त्यामुळेच वनजमिनींवर अतिक्रमण होते अशी चर्चा आपण ऐकतो. त्यामुळे हे ‘अपरिहार्य’च असल्याची आपली धारणा बनते. मग अधिवास आणि अन्नपाणी गमावलेले वन्यजीव जेव्हा मानवी वस्तीत येतात तेव्हा ‘वन खात्याने बंदोबस्त करावा,’ अशी मागणी करण्यापलीकडे आपल्याला मार्ग दिसत नाही. मानवप्राणीच सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यामुळे त्याच्या इच्छेप्रमाणे, गरजेप्रमाणे सर्वकाही घडणार या विचारामुळेच आज ठिकठिकाणी मानव-वन्यजीव संघर्ष उभा राहिलेला दिसतो.

वास्तविक वन्यजीवांचे अस्तित्व आपल्याला पुराणकथांपासून सर्वत्र दिसते. वाघ-सिंहावर आरूढ होणाऱया देवदेवतांची आपण पूजा करतो. ऋषिमुनींची गुरुकुले घनदाट अरण्यात असत असे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात. याचा अर्थ मानव, पशुपक्षी, जीवजंतू, झाडेझुडपे या सर्वांचे साहचर्य, सहअस्तित्व पूर्वीपासूनच आहे. आपण उक्रांत होत गेलो तसतसे सुखी झालो; पण तितकेच अहंकारीही झालो. अतिरिक्त शेतजमीन, कारखानदारी, धरणे, रस्ते, बोगदे, घाट अशा अनेक कारणांसाठी आपण वनक्षेत्रात सातत्याने हस्तक्षेप करीत राहिलो. वाढत्या शहरीकरणामुळे आपली पूर्वीची निसर्गपूरक जीवनशैली पार बदलून गेली. शेतात धान्य तयार झाल्यानंतर काही कणसे पक्ष्यांसाठी घराच्या ओसरीवर टांगून ठेवण्याची पद्धत आजही अनेक शेतकरी कुटुंबांमध्ये दिसते. अशा प्रथा-परंपरांमागे काय आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जगात बहुतांश देशांनी लॉकडाऊन जारी केला. या काळात निसर्गात झालेले बदल लपून राहिलेले नाहीत. गायब झालेली पाखरे पुन्हा अंगणात येऊ लागल्याचा अनुभव अनेकांनी घेतला. प्रदूषण कमी झाल्यामुळे नद्या स्वच्छ झाल्या आणि जलचर सुखावले. जंगलांपासून जवळ असलेल्या शहरांमध्ये वन्यजीव चक्क फेरफटका मारताना दिसले. प्रश्न असा की, नुकत्याच अनुभवलेल्या या परिस्थितीतून आपण काय बोध घेणार? लॉकडाऊन लवकरात लवकर संपावा आणि अर्थव्यवस्थेची चाके गतिमान व्हावीत असेच प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. तथापि, मानवी हालचाली थंडावल्यावर पशुपक्ष्यांनी जी मोकळीक अनुभवली त्याचा विचार आपण करणार का?

आपण कितीही भौतिक प्रगती साधली तरी अन्नधान्याशिवाय आपण जगू शकत नाही आणि निसर्गाच्या समतोलावरच आपली शेती अवलंबून आहे याची जाणीव आता तरी व्हायला हवी. याखेरीज आपली अर्थव्यवस्था, पिण्याचे पाणी या बाबीही निसर्गाचा समतोल राहिला तरच सुरळीत राहणार आहेत. अशा वेळी आपण केवळ विकासावरच लक्ष केंद्रित केले आणि तो विकास शाश्वत असला पाहिजे याकडे दुर्लक्ष केले तर आपण मानवी जीवनावरील मोठय़ा धोक्याच्या दिशेने करीत आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण संपूर्ण जगभरात प्रचंड वाढले आहे. पावसाळ्यात पावसाचे दिवस कमी झाले असून एकाच दिवसात अधिक पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. या वर्षीही आपण दुष्काळी मानल्या जाणाऱया भागांत अतिवृष्टी अनुभवली आहे. ऐन कोरोनाकाळात कोकण किनारपट्टीला धडकलेल्या वादळाने केलेला विध्वंस आपण विसरलेलो नाही. जलवायू परिवर्तनाचे हे थेट परिणाम असून हे परिवर्तन निसर्गाच्या असंतुलनामुळेच होत आहे. जागतिक व्यासपीठांवर ही समस्या गांभीर्याने चर्चिली जात असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या स्तरावर फारसे आशादायक चित्र नाही. उलट आपल्याकडे तर पुन्हा एकदा जुन्याच विषयांवरील संघर्ष पुन्हा निर्माण होताना दिसत आहेत. उदाहरणार्थ, उद्योगांसाठी पर्यावरण आघात अहवालाची नियमावली बदलण्याच्या मुद्दय़ावरून झालेला वाद.
माणूस आणि वन्यजीव संघर्ष टाळायचा असेल तर आपल्यासारखीच वन्यजीवांची ‘स्पेस’ आपण सर्वप्रथम मान्य केली पाहिजे. कोरोनासारखे विषाणू वास्तविक वन्यजीवांच्या शरीरातील आहेत आणि या प्रजाती विलुप्त झाल्यामुळे त्यांना नवे ‘घर’ हवे आहे अशी एक ‘थिअरी’ कोरोनाच्या प्रसारकाळात मांडली गेली. दुर्दैवाने ती खरी ठरल्यास असे असंख्य विषाणू मानवी शरीरात शिरण्यासाठी तयार असतील हाही गंभीर धोका आपण विचारात घेतला पाहिजे. कोणत्याही जीवावर अतिक्रमण करून आपण सुखी होऊ शकणार नाही. कारण त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम आपल्यावर होणारच आहे हे किमान कोरोनाकाळात आपण जाणून घेतले पाहिजे. शिवाय कमीत कमी गरजा ठेवून आपल्याला जगणे शक्य आहे हेही याच काळाने आपल्याला शिकवले आहे. प्राणीप्रजाती आणि वनस्पती विलुप्त होण्याचा वेग कमी करून आपण स्वतःलाच गंभीर धोक्यापासून वाचवणार आहोत हे वास्तव स्वीकारण्यास वन्यजीव सप्ताह हे योग्य निमित्त आहे.

मानव एकटाच या पृथ्वीचा स्वामी नसून लाखो जीव इथे नांदतात. त्यांची एक साखळी आहे आणि आपणही त्याच साखळीचे घटक आहोत याची जाणीव या वर्षी आपल्याला अधिक ठसठशीतपणे होऊ शकते. या पार्श्वभूमीवर इंटरगव्हर्नमेंटल सायन्स पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी ऍण्ड कोसिस्टिम सर्व्हिसेसने (आयपीबीईएस) गेल्याच वर्षी सादर केलेल्या अहवालाकडे अधिक डोळसपणे आणि गांभीर्याने का पाहू नये? या संस्थेची स्थापना 2012 मध्ये करण्यात आली होती आणि 132 देश तिचे सदस्य आहेत. या संस्थेने 350 पेक्षा अधिक शास्त्रज्ञांच्या मदतीने तयार केलेला जैवविविधतेविषयीचा अहवाल भयावह आहे. पृथ्वीवरील प्राणी आणि वनस्पतींच्या दहा लाख प्रजाती गंभीररीत्या धोक्यात आलेल्या आहेत, असे हा अहवाल सांगतो. हे नुकसान किती प्रचंड आहे हे आपल्याला त्याचे परिणाम जाणवू लागले तरी पटत नाही हे दुर्दैव आहे. पहिल्या औद्योगिक क्रांतीपासूनच या नुकसानीला प्रारंभ झाला असला तरी 1980 पासून 2000 पर्यंत या ऱहासाचा वेग प्रचंड वाढल्याचे आकडेवारी सांगते. अवघ्या वीस वर्षांच्या या कालावधीत 10 कोटी हेक्टर क्षेत्रावरील जंगले संपुष्टात आली. जेवढी जंगले शिल्लक आहेत त्यातील 75 टक्के संकटातच आहेत.

(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत.)